अर्णब गोस्वामीला अटक न करता आधी समन्स द्या - उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश

October 19,2020

मुंबई: १९ ऑक्टोबर -  ‘टीआरपी घोटाळा’  प्रकरणी रिपब्लिक चॅनेलच्या  याचिकेवर आज  सुनावणी सुरू होती. मुंबई पोलिसांनी चॅनेलच्या टीआरपी घोटाळ्याबाबत गुन्हा दाखल केला असून, हे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी सोपवण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका रिपब्लिक चॅनेल दाखल केली होती. मात्र, मुंबई हायकोर्टाने रिपब्लिक चॅनेलची ही मागणी फेटाळली आहे. तर, अर्णब गोस्वामीला थेट अटक न करता, आधी त्याला समन्स द्या, असा निर्णय हायकोर्टाने दिला आहे. तसेच त्याच्या चौकशीनंतर अटकेचा निर्णय घेण्यात यावा, असेदेखील मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे.

हायकोर्टात आज या प्रकरणावर सुनावणी सुरू होती. रिपब्लिक चॅनेल तर्फे ज्येष्ठ वकील हरीश साळवे, तर मुंबई पोलिसांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयापुढे बाजू मांडली. टेलिव्हिजन चॅनेल्सच्या टीआरपीमध्ये फेरफार करणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला होता. या प्रकरणात ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ आणि ‘रिपब्लिक टीव्ही’ या वाहिन्यांना अवैधरित्या वाढीव टीआरपीचा लाभ मिळाला होता, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली होती.

परमबीर सिंह यांनी 8 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात सविस्तर माहिती दिली होती. याप्रकरणी फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाच्या चालकांना अटक करण्यात आली आहे. तर, रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठीही रॅकेट चालवणाऱ्यांकडून मदत घेण्यात आल्याची माहितीही समोर आल्याचे परमबीर सिंह यांनी सांगितले. त्यामुळे रिपब्लिक टीव्हीच्या प्रवर्तकांचीही चौकशी करण्यात आली आहे.