१८ वर्षांपूर्वी दुरावलेला मुलगा परतला कुटुंबात, सोशल मीडियाची कमाल

October 19,2020

चंद्रपूर : १९ ऑक्टोबर - सोशल मीडियामुळे 18 वर्षांआधी दुरावलेला मुलगा कुटुंबात परतल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात उजेडात आली आहे. वडिलांनी घरगुती कारणावरुन रागावल्याने घर सोडलेल्या जेकब फ्रान्सिस याला रुडकी येथील सैनिक कुटुंबाने आश्रय दिला होता. सैनिकपुत्राने सोशल मीडियावर जेकबसाठी मोहीम चालविल्यानंतर आता तो चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील त्याच्या घरी पोहोचला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात जेकब फ्रान्सिस आपल्या कुटुंबीयांसह राहत होता. घरगुती कारणावरुन वडिलांनी रागावल्यावर त्याने 2002 साली घर सोडले. त्यावेळी त्याने रेल्वेगाडीत चढून दिशाहीन प्रवास सुरु केला. आठ वर्षांचा जेकब अनेक शहरात फिरला. अखेर एकेदिवशी तो उत्तराखंड राज्यातील रुडकी स्टेशनवर उतरला. स्वतःच्या गावाचे नाव आणि पत्ता आठवत नसलेल्या या अनाथ मुलाची अवस्था पाहून एका माजी सैनिकाने त्याला आश्रय दिला.

माजी सैनिकाच्या शेतीकामात जेकब रमला. याच परिवाराने त्याचे शिक्षणदेखील पूर्ण केले. सैनिकाचा मुलगा सुमित वर्मा याने जेकबच्या कुटुंबाबाबत माहिती मिळावी यासाठी त्याच्या फोटोसह अनेकदा सोशल मीडियावर माहिती दिली. त्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होती. मात्र अपेक्षित यश मिळत नव्हते.

वर्मा कुटुंबाने आपले प्रयत्न जारी ठेवले. अखेर जेकबच्या भावाने फेसबुकवर व्हायरल झालेल्या बेपत्ता मुलाची पोस्ट पाहिली. त्यांनंतर जेकबच्या कुटुंबियांना आशेचा किरण मिळाला. मात्र ओळख पटविण्यात अडचण येत होती. 8 वर्षांचा जेकब आता 26 वर्षांचा झाल्याने त्याच्या चेहऱ्यात बदल झाला होता.

मात्र, सर्व अडचणींना दूर सारत फ्रान्सिस कुटुंब रुडकी येथे पोहोचले. जुन्या स्मृती जागवून जेकबची ओळख पटवून त्याला वर्मा कुटुंब आणि पोलिसांच्या मदतीने बल्लारपूर येथे परत आणले गेले. जेकब सकुशल असल्याचे पाहून कुटूंबीयांनादेखील आनंद झाल जेकब हरविल्याची तक्रार अल्बर्ट नावाच्या त्याच्या भावाने 18 वर्षांपूर्वी बल्लारपूर पोलीस स्थानकात नोंदविली होती. सोशल मीडियावरील वर्मा कुटुंबीयांची व्हायरल पोस्ट पाहून अल्बर्टने पुन्हा एकदा बल्लारपूर पोलिसांना मदतीची विनंती केली. बल्लारपूर पोलिसांनी रुडकी येथे संपर्क साधून सर्वतोपरी मदत करत जेकबला बल्लारपूरात आणण्यासाठी सहकार्य केले. जेकब आता त्याच्या कुटुंबीयांना परत मिळाल्याने पोलिसांनीही समाधान व्यक्त केले.