काश्मीर ते कन्याकुमारी सायकलने प्रवास करणाऱ्या मीरा वेलणकर नागपुरात

October 19,2020

नागपूर : १९ ऑक्टोबर - स्वस्थ आरोग्यासाठी डॉक्टर व्यायाम करण्याचा सल्ला सर्वांनाच देतात. त्यातच कोणता व्यायाम करायचा असे कोणी विचारले तर योग- प्राणायामसह पायी फिरणे किंवा सायकलिंग करण्याचा सल्ला ते देतात. आजकाल सायकलिंगने शे-सव्वाशे किमीचा प्रवास करणे ही एक संस्कृती ठरत आहे. कमी अंतराचा प्रवास सायकलने सहज शक्य आहे. परंतु हेच अंतर जास्त असेल तर ते इतरांच्या सहकार्याशिवाय आणि प्रायोजकतेशिवाय शक्य नाही. मात्र, यास मीरा वेलणकर अपवाद ठरल्या आहेत. मीरा वेलणकर यांनी स्वत:च्या भरवशावर सहकारी रॉबर्ट किंग्सलेच्या साथीने कन्याकुमारी ते काश्मीर असा सायकलने प्रवास करण्याचे निश्चित केले असून या प्रवासानिमित्त त्या शनिवारी नागपुरात दाखल झाल्या होत्या.

दोन मुलींची आई असलेल्या मीरा वेलणकर आणि रॉबर्ट किंग्सले यांनी एकत्रितपणे सायकल चालवत (टॅन्डम सायकल राईड) मोठे अंतर कापण्याचा हा निर्णय घेतला असून चक्क कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास हे दोघे करीत आहेत. हा प्रवास करताना दोघेही शनिवारी रात्री नागपुरात दाखल झाले. नागपुरात सायकल राईडर्स समुहाने त्यांचे स्वागत केले. रविवारी त्यांची चमू पुढील प्रवासासाठी काश्मीरच्या दिशेने रवाना झाली. मीरा व रॉबर्ट यांची चमू १० ऑक्टोबरला कन्याकुमारीहून निघाली. यादरम्यान हैदराबादमार्गे प्रवास करीत नवव्या दिवशी ते नागपूरला दाखल झाले होते. मीरा यांनी सोलो सायकलमध्ये विक्रम नोंदविले आहेत. मात्र, टॅन्डम राईडमध्ये एवढे मोठे अंतर पार करण्याचा विक्रम नाही. कन्याकुमारी ते काश्मीर हे अंतर ३ हजार ५०० किमीपेक्षा अधिक असून १६-१७ व्या दिवशी पूर्ण करण्याचा निर्धांर त्यांच्या चमूने केला आहे. प्रत्येक ठिकाणी लोक उत्साहात स्वागत व मदत करीत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी काश्मीर ते कन्याकुमारी असे नियोजन केले होते. परंतु ते शक्य झाले नाही. त्यामुळे कन्याकुमारी ते काश्मीर असा उलट आणि चढाव असलेला प्रवास करण्याचा निर्धार त्यांनी केला. रविवारी दुपारी १ वाजता ते शिवनी मार्गे काश्मीरच्या दिशेने रवाना झाले. रविवारी रात्री शिवनीमध्ये मुक्काम करून पुढचा प्रवास मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान व दिल्ली होत जम्मू व काश्मीरच्या पायथ्याशी प्रवास थांबवू, असे त्यांनी सांगितले.