डॉक्टरांचा हलगर्जीपणा ठरला शेतकऱ्याच्या मृत्यूचे कारण

October 19,2020

नागपूर : १९ ऑक्टोबर - डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना कुही तालुक्यातील मांढळ येथे घडली. गंगाधर रामजी मुटकूरे (५९, रा. मांढळ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 

मुटकूरे हे शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. १६ ऑक्टोबरला नेहमीप्रमाणे ते आपल्या शेतात फवारणी करीत गेले. यादरम्यान त्यांच्या पायाला सापाने चावा  घेतला. मुटकुरे यांचे लक्ष पायाकडे गेले. त्यांना पायाजवळ गवऱ्या साप दिसला. त्यांनी आरडाओरड करून बाजूच्या शेतात काम करीत असलेल्या त्यांच्या भावाला आवाज दिला. व साप चावल्याचे सांगितले. त्यांच्या भावाने लगेच दुचाकीवर बसवून मांढळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. या वेळी डॉ. डांगोर ओपीडीमध्ये होत्या त्यांनी मुटकुरे यांना विचारले असता मुटकुरे आणि त्यांच्या भावाने सर्पदंश झाल्याचे सांगितले. डॉ. डांगोर यांनी टेक्झा व विनंटा असे दोन इंजेक्शन दिले. जखमी अवस्थेत असतानाही त्यांच्या पायाचे ड्रेसिंग केले नाही. डॉ. डांगोर यांनी मुटकुरे यांच्या भावाला तुम्ही यांना कुही येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. पण त्यावेळी रुग्णवाहिका हजर नव्हती. मांढळ व पचखेडी रुग्णालयाचे इंचार्ज डॉ. नागदेवे हे आपल्या खासगी कामाकरिता या रुग्णवाहिकेचा वापर करत असल्याचे काही जणांनी सांगितले. त्याच वेळी मुटकुरे यांच्या भावाने त्यांना दुचाकीवर बसवून रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना कुही येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. येथील रुग्णवाहिकेने त्यांना नागपूर येथील शासकीय मेडिकल रुग्णालय येथे आणले, तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.