भगतसिंग कोश्यारी यांची भूमिका गिनीज बुकात नोंद करण्यासारखी - विजय वडेट्टीवार

October 19,2020

नागपूर : १९ ऑक्टोबर - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात मांडलेली भूमिका गिनीज बुकात नोंद करण्यासारखी आहे, अशी उपरोधिक टीका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 

गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यपालांनी शब्द जपून वापरायलोय हवे होते, असे म्हटले आहे. शहा यांच्या प्रतिक्रियेबाबत वडेट्टीवार यांना विचारले असता, महाराष्ट्राच्या सध्याच्या राज्यपालांची भूमिका गिनीज बुकर नोंद करण्यासारखी आहे. विद्यमान राज्यपाल मात्र उठसुठ वादग्रस्त विधान करत असतात. ते कुठल्या चष्म्यातून राज्य सरकारकडे पाहतात हे अवघा  महाराष्ट्र बघत आहे. त्यांनी ज्या कुठल्या रंगाचा, विचाराचा आणि भावनेचा चष्मा लावला आहे, तो चष्मा त्यांनी राज्यपाल झाल्यावर काढायला पाहिजे आणि त्याऐवजी महात्मा गांधी यांच्यासारखा स्वच्छ आणि निष्पक्ष चष्मा घातला पाहिजे. 

राज्यपालांनी वादग्रस्त भूमिका न घेता राज्यघटनेनुसार काम करणे अपेक्षित आहे. त्यांनी राज्यघटनेला बांधील असणारी भूमिका स्वीकारायची, भाजपच्या विचारसरणीतील यापूर्वीचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी त्या पदाची शान वाढवली. परंतु सध्याचे राज्यपाल पदाला गालबोट लागेल, अशी भूमिका घेत आहेत. असेही ते म्हणाले. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यपालांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. तर नुकतेच अमित शहा यांनी याप्रकरणी भाष्य केले होते. त्यावर मत व्यक्त करताना विजय वडेट्टीवार यांनी राज्यपालांना टोला  हाणला.