प्रसाधनगृहांच्या निर्मितीबाबत कार्यवाही करा - महापौर संदीप जोशी

October 19,2020

नागपूर :१९ ऑक्टोबर - आजघडीला शहरात प्रसाधनगृहांची संख्या तोकडी आहे. एकीकडे आपले शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्याचे आवाहन केले जात असताना नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शहरातील नागरिकांच्या सुविधेसाठी विविध गर्दीची ठिकाणे, बाजार, चौक किंवा अन्य ठिकाणी प्रसाधनगृहांची निर्मिती होणे आवश्यक आहे. शहरात प्रसाधनगृहांची संख्या वाढल्यास नागरिकांना सुविधा निर्माण होईल. यासाठी झोनस्तरावर जागेची उपलब्धता आणि त्यातील अडथळे दूर करून लवकरात लवकर प्रसाधनगृहांच्या निर्मिती संदर्भात कार्यवाही करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

नागरिकांच्या सुविधेकरिता झोननिहाय सुलभ शौचालय बांधकामाचे प्रस्ताव जागेच्या मालकीसह तयार करून त्यानुसार प्रस्तावाच्या अंमलबजावणीबाबत आज  महापौर संदीप जोशी यांनी बैठक घेतली. मनपा मुख्यालयातील महापौर कक्षामध्ये झालेल्या बैठकीत उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर, मुख्य अभियंता लीना उपाध्ये, मुख्य लेखा व वित्त अधिकारी हेमंत ठाकरे, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ.प्रदीप दासरवार, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, कार्यकारी अभियंता सर्वश्री अविनाश बाराहाते, धनंजय मेंढुलकर, विजय गुरूबक्षानी, श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते.