चाचण्यांची संख्या वाढविण्याचे आरोग्य यंत्रणेला जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

October 19,2020

नागपूर : १९ ऑक्टोबर - नागपूर जिल्ह्यामध्ये उद्यापासून आरोग्य उपकेंद्र, तालुका आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड होऊन गेलेल्यांची तपासणी (पोस्ट कोवीड ओपीडी) सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सोमवारी दिले. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करताना पोस्ट कोविड रुग्णांसाठी 12 ते 1 या कालावधीमध्ये विशेष ओपीडी सुरू ठेवण्याचे आदेश दिलेत.

नागपूर जिल्ह्यामधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. तथापि, आरोग्य सूत्रांच्या सूचनेनुसार दुसऱ्या कोरोना लाटेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज केली जात आहे. हिवाळ्याच्या मध्यामध्ये कोरोना आजाराचा उद्रेक झाल्यास यंत्रणा आणखी सक्षम व्हावी. यासाठी देखील आज जिल्हाभरातील आरोग्य, महसूल व अनुषंगिक यंत्रणेशी जिल्हाधिकाऱ्यांनी थेट संवाद साधला. मोठ्या प्रमाणात आरटीपीसीआर चाचण्यांचा वेग वाढविण्यात यावा. 'माझे कुटुंब माझे अभियान' तसेच 'माझे क्षेत्र माझा पुढाकार' या योजनांमध्ये सर्व यंत्रणा झोकून देऊन काम करावे, असे निर्देश आज जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत.

जिल्ह्यामध्ये कोविड झालेल्या रुग्णांना संपर्क साधून त्यांच्या आरोग्य संदर्भात विचारणा करण्यात यावी, श्वसना संदर्भात त्रास असणाऱ्या व अन्य गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांना आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात यावा, त्यांना वैद्यकीय उपचार सोबतच खानपान व प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्यायामाच्या सूचना करण्यात याव्यात. भौतिक उपचार सुचविण्यात यावे, अशा सूचना केल्या. यासोबतच या आजारातून बरे झालेल्या रुग्णांना अन्य कोरोनाग्रस्त रुग्णांना उपयोगी पडणाऱ्या प्लाजमा दान करण्यासाठी देखील प्रवृत्त करण्यात यावे, अशी सूचना त्यांनी दिली.

येणाऱ्या काळामध्ये एकीकडे पुन्हा दुसरी लाट येण्याची शक्य ता व्यक्त केली जात आहे. सोबतच शाळा, कॉलेज, महाविद्यालय देखील सुरू करण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे. अशावेळी कोरोना रुग्णांसाठी तयार करण्यात आलेले कॉरेन्टाइन केंद्र खाली करावे लागू शकते. अशा वेळी आपापल्या क्षेत्रात पर्यायी उपाययोजना काय आहे, याबाबत सर्व यंत्रणेने लक्ष ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.