कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा - डॉ नितीन राऊत

October 19,2020

नागपूर : १९ ऑक्टोबर - उत्तर प्रदेशमध्ये कायदा व सुव्यवस्था नष्ट झाल्याने स्त्रिया व अनुसूचित जातीच्या लोकांविरुद्ध अत्याचार व हिंसाचाराच्या घटना वाढत असल्याने  तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आणि राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल यांच्याकडे पत्र लिहून केली आहे. 

आज डॉ नितीन राऊत यांच्या वतीने काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. या निवेदनात डॉ राऊत यांनी दलितांवर होणारे हिंसक अत्याचार व उत्तर प्रदेशमध्ये  बलात्काराच्या वाढत असलेल्या घटना यावर लक्ष वेधले आहे. अशा घटना टाळण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोणतेच ठोस पाउले उचलत नसून उलट दलित, महिला आणि अल्पसंख्याकांविरोधात अमानवीय परिस्थिती निर्माण करून भाजपा तेथे आपला फॅसिस्ट अजेंडा राबवत असल्याचा आरोप डॉ. राऊत यांनी केला आहे. 

हाथरसच्या घटनेनंतरही दलित महिलांवरील बलात्काराच्या घटना सरार्स घडत असल्याने डॉ राऊत यांनी दुःख व्यक्त केले. या घटनेच्या काही दिवसानंतर बाराबंकी जिल्ह्यातील खेड्यात एका अल्पवयीन दलित मुलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबण्यात आला.  तिचा मृतदेह धान्याच्या शेतात फेकून दिले. शवविच्छेदन अहवालात लैंगिक अत्याचाराची पुष्टी देखील झाली आहे.

गेल्या चार वर्षांत उत्तर प्रदेशात महिलांविरूद्धच्या गुन्ह्यांमध्ये 67 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  उत्तर प्रदेशात दररोज बलात्काराच्या घटना वाढत आहेत. यामुळे महिलांमध्ये पुढचा बळी आपण तर ठरणार नाही ना अशी भीती व असुरक्षितता निर्माण झाली आहे. 

गंभीर गुन्ह्यातील असंख्य प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असताना महिला व अनुसूचित जातीतील लोकांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांचा वेळेवर तपास न होत असल्याचा डॉ राऊत यांनी आरोप केला आहे.  बलात्कार आणि हिंसाचाराच्या गुन्ह्यांव्यतिरिक्त अनुसूचित जातींच्या लोकांच्या  मालमत्तेचे नुकसान मोठ्या प्रमाणात केल्या जात असल्याचा डॉ राऊत यांनी पत्रात उल्लेख केला आहे.