देशात लवकरच लागू करणार नागरिकत्व कायदा - जे. पी. नड्डा

October 20,2020

नवी दिल्ली : २० ऑक्टोबर - कोरोनाच्या महामारीमुळे नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्यात आली असली, तरी हा कायदा लवकरच देशभरात लागू करण्यात येईल, अशी ग्वाही भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी येथे दिली.

उत्तर बंगालमधील स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीत नड्डा बोलत होते. समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी भाजपा करीत आहे, उलट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या पक्षाचे राजकीय हित जोपासण्यासाठी राज्यात ‘फूट पाडा आणि राज्य करा’ हे धोरण अवलंबले आहे, असा आरोप त्यांनी केला.

नागरिकत्व कायदा संसदेत पारित झाला आहे. राष्ट्रपतींनीही त्यावर स्वाक्षरी केली असल्याने देशातील कोणतेही राज्य या कायद्याच्या अंमलबजावणीचा मार्ग रोखू शकत नाही. त्याची अंमलबजावणी होणारच असून, कोणत्याही भारतीय नागरिकाचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही. हा कायदा सर्वांच्याच हिताचा आहे, असे नड्डा यांनी स्पष्ट केले.

या कायद्याची अंमलबजावणी यावर्षीच्या सुरुवातीलाच होणार होती, पण कोरोनाच्या संकटामुळे ती लांबणीवर टाकण्यात आली. आता स्थितीत हळूहळू सुधार होत आहे. जनजीवनही पूर्वपदावर येऊ लागले आहे. त्यामुळे लवकरच या कायद्याची अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होत आहे. यात भाजपा स्पष्ट बहुमतासह सरकार स्थापन करणार आहे. ममता बॅनर्जी यांचा तृणमूल कॉंगे्रस पक्ष हिंसाचारात बुडाला आहे. जनता या सरकारला आणि पक्षाला कंटाळली आहे. त्यांना बदल हवा आहे आणि यासाठी ते मोठ्या अपेक्षेने भाजपाकडे पाहात आहे, असे ते म्हणाले.