बॅंड व्यावसायिकांनी केले बॅंड बजाओ आंदोलन

October 20,2020

बुलढाणा : २० ऑक्टोबर - चिखली तालुका सकल मातंग समाजाच्या वतीने बॅड व्यावसायिक व कलाकारांच्या विविध मागण्यांसंदर्भात 19 ऑक्टोबर रोजी साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करत तहसील कार्यालयासमोर बँड बजाव आंदोलन करण्यात आले. कोरोना या जागतिक महामारीमुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

21 मार्चपासून पूर्णपणे झालेल्या लॉकडाऊनमुळे त्याचा फटका सर्वच व्यावसायिकांना बसलेला आहे. आशा मंगलप्रसंगी मंगल धून वाजवून लोकांना आनंद देणारा बँड व्यावसायिक आणि कलाकार अतिशय अडचणीत सापडल्यामुळे हलाखीचे जीवन जगत आहे.बँड व्यावसायिक त्यांच्याकडे असणार्या सर्वच कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तरी बँड व्यावसायिकांना रीतसर परवानगी देण्यात यावी, फेब्रुवारी ते जुलै दरम्यान 90टक्के लग्न समारंभाचा, बँड व्यावसायीकांचा हंगाम असतो .हि बाब लक्षात घेता आमचा यावर्षीचा व्यवसाय शुन्य असल्यामुळे सरकारने विशेष आर्थिक पॅकेजची मदत जाहीर करण्यात यावी व तसेच मातंग समाजाचे जेष्ट नेत्यांची बदनामी करण्यार्यावर कडक कारवाई करण्यात यावी .या सर्व मागण्यांची तात्काळ दखल घेण्यात यावी.यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी चिखली तहसील कार्यालयासमोर आज दि. 19 ऑक्टोबर सोमवार रोजी बँड बजाव आंदोलन करण्यात आले.

 या आंदोलनात आ. महाले, पंस सभापती सिंधुताई तायडे, मनीषा सपकाळ, रामदास देव्हडे, पंडितराव देशमुख, डॉ. कृष्णकुमार सपकाळ, नगरसेवक अनुप महाजन, प्रा. राजू गवई, शेख अनिस भाई, विजय नकवाल, शैलेश बाहेती, गोविंद देव्हडे, नामु गुरूदासानी, दत्ता सुसर, सुभाषाअप्पा झगडे, नगरसेविका अर्चना खबूतरे, हरिभाऊ परिहार, विकी हरपाळे यांनी सहभाग घेत आंदोलनाला पाठिंबा दिला.

 आंदोलनाला पाठिंबा देत आ.महाले म्हणाल्या की, मातंग समाजातील बँड व्यावसायिक व कलाकार यांच्या न्याय हक्कासाठी 19 ऑक्टोबर रोजी समाजाच्या वतीने आयोजित बँड बजाव आंदोलनात सहभागी होवून बँड कलाकारांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले .

 बॉलीवुडची चिंता करणारे आघाडी सरकार, मातंग समाजाचा पारंपरिक व्यवसाय करणार्या कलाकारांकडे मात्र दुर्लक्ष करत आहे .तरी बँड व्यावसायिकांना आघाडी सरकारने तात्काळ आर्थिक पॅकेजची मदत करावी. रीतसर बँड व्यावसायिकांना परवानगी देऊन न्याय द्यावा.असे त्यांनी सांगितले