वर्ध्यात आयपीएल सामन्यावर सुरु असलेल्या सट्ट्यावर धाड, एक अटकेत

October 20,2020

वर्धा : २० ऑक्टोबर - प्रतापनगर परिसरातील भालेराव यांचे घर भाड्याने घेऊन त्या ठिकाणी आयपीएल सामन्यावर सट्टा चालविणार्या सलीम खाँ शहादत खाँ पठाण रा. आनंदनगर याला रामनगर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास करण्यात आली.

 मिळालेल्या माहितीनुसार सलीम खाँ शहादत खाँ पठाण याने धनराज भालेराव याचा फ्लॅट भाड्याने घेऊन त्यामध्ये टि.व्ही.वर सुरू असलेल्या क्रिकेटच्या आय.पी.एल. सामन्यावर भ्रमणध्वनीद्वारे सट्टा चालवित असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी भालेराव यांच्या फ्लॅटवर छापा मारला असता सलीम खाँ शहादत खाँ पठाण हा टी.व्ही.वर सुरू असलेल्या सामन्यावर सट्टा चालवत असल्याने मिळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. विचारपूस केली असता राजु ठमेकर रा. रामनगर यांच्यासाठी काम करीत असल्याचे त्याने सांगितले. घटनास्थळावरुन क्रिकेट जुगाराकरिता वापरण्यात आलेले साहित्य, 3 मोबाईल, एक टि.सी.एस. एल.सी.डी. टि.व्ही., सेटटॉप बॉक्स असा 33 हजार 51 रुपयांचा मुद्येमाल जप्त करुन ताब्यात घेतला. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांच्या निर्देशानुसार सपोनि मिश्रा, संतोष कुकडकर, अमर लाखे, आनंद भस्मे, धर्मेंद्र अकाली, निलेश करडे, अनिल चव्हाण यांनी केली.