गोमयापासून दिवे बनवण्याच्या व्यवसायात २५ महिलांना रोजगार

October 20,2020

गोंदिया : २० ऑक्टोबर - उच्च शिक्षित असूनही नोकरीच्या मागे न लागता पतीच्या खांद्याला खांदा लावून तालुक्यातील चुटिया येथील प्रीती टेंभरे या महिलेने 'गोमय वसते लक्ष्मी' या उक्तीप्रमाणे दिवाळीसाठी गायीच्या शेणापासून पर्यावरण पूरक दिवे व कृत्रिम रांगोळी बनविण्याचा उपक्रम हाती घेतला असून त्यांच्या या कार्यामुळे बचतगटाच्या २५ महिलांना रोजगार उपलब्ध होत गोमय दिव्यांमुळे अनेक महिलांचे भाग्य उजळले आहे.

गोंदिया शहरापासून ६ किलोमिटर अंतरावर असलेल्या चुटिया या गावात ॠषी टेंभरे यांनी काही वर्षांपूर्वी लक्ष्मी गौशाला ट्रस्टची स्थापना केली. या गौशाळेत देशी, गीर गाईंचे संगोपनाचे कार्य सुरू केले. त्यांच्या कार्यात त्यांची पत्नी प्रिती यांनीही हातभार लावायला सुरुवात केली. दरम्यान अनेकदा त्यांनी चर्चासत्र व वेबिनारमध्ये सहभागी होऊन आपले ज्ञान वृद्धिंगत करीत नवीन काहीतरी करण्याचे ध्येय बाळगले. त्यांच्या याच कामाची पावती त्यांना राष्ट्रीय कामधेनू आयोगाच्या माध्यमातून मिळाली. या आयोगाच्या माध्यमातून त्यांना गोमय उत्पादन संदर्भात प्रशिक्षण मिळाले व त्यांनी आता दिवाळीच्या पर्वावर स्थानिक महिलांच्या मदतीने या देशी गायींच्या शेणापासून दिवे व कृत्रीम रांगोळी बनविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. विशेष म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये दिवाळी सणाला विशेष महत्व आहे. दिवाळीत हिंदू संस्कृतीनुप गायीला पुजले जाते. तिला मातेचे स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे या गायींच्या शेणापासून दिवाळीसाठी तयार करण्यात आलेल्या दिव्यांना महत्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे या आधी गायींच्याच शेणापासून राख्यासुध्दा तयार करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पर्यावरणपूरक असे शेणापासून गणेश मुत्र्याही तयार करण्यात आल्या होत्या.

 गायीच्या शेणामध्ये डींक, विशेष अशा झाडाची साल, गवारफाटा, मेथीच्या, चिंचेच्या बियांची भुक्टी आदींचे मिश्रण तयार करून ते साहित्य विशेष अशा साच्यात घातले जातते. आधार घेतला जातो. साच्यात ते घट्ट झाल्यानंतर त्यांना हाहेर काढून रंगरंगोटी केली जात असल्याचे टेंभरे यांनी सांगीतले.

 चुटिया येथील निर्मित गोमय दिव्यांना गुजरात येथील जामनगर, राजकोट, अहमदाबाद, दिल्ली, मध्य प्रदेशातील रतलाम तसेच महाराष्ट्रातील मुंबई, औरंगाबाद, जळगाव, नागपुर येथून मागणी प्राप्त झाली असून पहिल्या खेपेत १४ हजार दिवे पाठविण्यात येणार असल्याचे प्रीती यांनी सांगितले.