अर्णब गोस्वामी पोलीस आयुक्तांविरोधात २०० कोटींचा दावा ठोकणार

October 20,2020

मुंबई : २० ऑक्टोबर - टीआरपी घोटाळा प्रकरणी रिपब्लिक टीव्ही विरोधातील एफआयआर रद्द करण्याबाबतच्या याचिकेवर सोमवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टात मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी टीआरपी घोटाळ्यातील एफआयआरमध्ये रिपब्लिक टीव्हीचे नाव नसल्याचे म्हटले. त्यानंतर रिपब्लिक टीव्हीच्यावतीने मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात २00 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत रिपब्लिक मीडिया नेटवर्कच्यावतीने पत्रक काढून माहिती दिली आहे.

रिपब्लिकच्या पत्रकानुसार, नेटवर्कच्यावतीने त्यांची लीगल टीमला मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात २00 कोटी रुपयांचा दावा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये रिपब्लिकच्या संपादकांच्या अब्रू नुकसानी विरोधात १00 कोटी आणि रिपब्लिक मीडिया नेटवर्कच्या नुकसानीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी १00 कोटी रुपयांचा समावेश आहे.

स्वत:च्या आयुक्तांविरोधात मुंबई पोलिसांनी आणि महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी हायकोर्टात टीआरपी प्रकरणातील एफआयआरमध्ये रिपब्लिक टीव्हीचे नाव नसल्याचे सांगितले. याद्वारे त्यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला, असे रिपब्लिकच्या पत्रकात म्हटले आहे.