अटल बोगद्यात प्रवासी टाकताहेत कचरा

October 20,2020

मनाली : २० ऑक्टोबर - पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ३ ऑक्टोबर रोजी अटल बोगद्याचे उदघाटन  झाले. समुद्रसपाटीपासून १0 हजार फूट उंचीवरील जगातील सर्वात लांब बोगदा (९.0२किमी) आहे. या बोगद्यामुळे मनाली ते लेह हे अंतर त्यामुळे ४६ कि.मी.ने तर प्रवासाचा कालावधी चार ते पाच तासांनी कमी झाला आहे. हा बोगदा अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असल्याने अनेकांनी त्याचा वापरही सुरु केलाय. मात्र त्याचवेळी या बोगद्याचा वापर वाढल्याने या परिसरामध्ये उघड्यावर कचरा फेकण्याचे प्रमाणही वाढले आहे. हा बोगदा त्याच्या वैशिष्ट्यांमुळे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनला असला तरी येथे येणारे पर्यटक उघड्यावर कचरा टाकत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छताही दिसून येत आहे.

कोरोना लॉकडाउननंतर पर्यटन व्यवसायाला हळूहळू सुरुवात झाली आहे. त्याच कालावधीमध्ये अटल बोगद्याचे उद््घाटन करण्यात आल्याने या भागामध्ये येणार्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. पण त्याचसोबत उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या ठिकाणाच्या प्रदुषणात वाढ होते आहे. तसेच यामुळे स्थानिक रहिवाश्यांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी अटल बोगद्यात सुसाट ड्रायव्हींगमुळे लागोपाठ अपघात घडल्याचे निदर्शनास आले होते. 

हा बोगदा ९.0२ कि.मी.चा असून तो मनाली ते लाहौल-स्पिती या भागांना जोडतो. वृत्तानुसार मागील दोन आठवड्यांमध्ये लाहौल भागातील महिलांनी चोरीच्या तसेच छेडछाडीच्या घटना वाढल्याचे म्हटले आहे. या मागार्ने रोहतांग पासला जाणार्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे या भागातील प्रदुषणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी रिकाम्या पाण्याच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थांची पाकीटे टाकलेली दिसत आहेत.

आम्ही यासंदर्भात चिंता व्यक्त केली असून वेळीच अशा गोष्टींना आळा घातला नाही तर परिस्थिती आणखीन बिकट होऊ शकते. लाहौलमध्ये खूपच साधे आणि पर्यटकांच्या स्वागतासाठी कायमच तयार असणारे लोकं राहतात. पर्यटकांनी येथील प्रदेश पाहण्यासाठी जरुर यावे मात्र इथे येऊन गोंधळ करणे आणि नियम मोडणे खपवून घेतले जाणार नाही. खास करुन स्वच्छेसंदर्भात तडजोड केली जाणार नाही, असे स्थानिकांच्या सामाजिक कार्यक्रमातील कार्यकर्ते असणार्या प्रेम काटोच यांनी सांगितले. केवळ लाहौल-स्पिती परिसरच नाही तर देशामध्ये उंचावर असणार्या अनेक थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांकडून उघड्यावर टाकण्यात येणारा कचरा हा मोठा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी स्थानिकांनी प्राधान्य घेऊन यासंदर्भात जनजागृती करण्यास सुरुवात केली असून पर्यटकांनी उघड्यावर कचरा टाकू नये यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र तरीही ही समस्या कायम आहे.