बेकायदा दत्तक देणारा संस्थाचालक अटकेत, पोलिसांनी घडवली माय-लेकरांची भेट

October 20,2020

नागपूर : २० ऑक्टोबर - दिशाभूल केल्यानंतर बेकायदेशीररित्या दत्तक देऊन मातेला तान्हुल्या बाळापासून विरक्त करण्याचा प्रयत्न करणार्या संस्थाचालकास बुटीबोरी पोलिसांनी अटक करून मायलेकाची भेट घडविण्यात आली आहे.

सदर महिलेचे हैद्राबाद येथील नरेश चिकटे या युवकाशी लग्न झाले. कोरोना प्रादुर्भाव आणि टाळेबंदीमुळे या दाम्पत्याने नागपूर गाठले व बुटीबोरी येथील घरी आले. नरेशला दारूचे व्यसन असल्याने तो नेहमी पत्नीस मारझोड करीत होता. या संबंधीची तक्रार महिलेने बुटीबोरी पोलिसात दाखल केल्याने नरेशने पत्नीला घराबाहेर काढले. विशेष म्हणजे ती यावेळी सहा महिन्यांची गर्भवती होती. अशा अडत्या काळात बुटीबोरी येथील एका महिलेने तिच्या भोजनालयात प्रसृती होईपर्यंत तिला आधार दिला. त्यानंतर साथ फाउंडेशनचा अध्यक्ष प्रयाग डोंगरे याच्याशी महिलेचा परिचय झाला. त्याच्याच मार्गदर्शनात ती पुनर्जन्म आर्शमात राहू लागली. दोन महिन्यानंतर आधार कार्ड काढण्याच्या बहाण्याने प्रयागने महिलेला नागपुरात आणून बेकायदेशीररित्या बाळ दत्तक देण्याचे पत्र तयार करवून घेतले. आणि परस्पर एका दाम्पत्यास बाळ दत्तक देऊन मायलेकाची ताटातूट केली. 

या संदर्भातील माहिती मिळताच वर्धा येथील चाईल्ड लाईनने प्रयागवर गुन्हा दाखल करून बाल कल्याण समितीने जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नागपूर यांना प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. बुटीबोरी पोलिसांनी आरोपीला अटक केली. चाईल्ड लाईन वर्धाचे जिल्हा समन्वयक आशिष मोडक, नागपूर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, जिल्हा बाल संरक्षण कक्ष वर्धा, सखी वन स्टॉप सेंटर यांच्या प्रयत्नाने बाळापासून दुरावलेल्या मातेची भेट घडली आहे.