राष्ट्रवादीला योग्य सन्मान द्यावाच लागेल - प्रफुल्ल पटेल

October 20,2020

नागपूर : २० ऑक्टोबर - आगामी महापालिका निवडणुकीची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केली आहे. यावेळी निवडणुका आघाडीत होतील, मात्र राष्ट्रवादी कमी जागांवर समाधान मानणार नाही. राष्ट्रवादीचा सन्मान घटकपक्षांना ठेवावा लागेल, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले.

सोमवारी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांची बैठक नागपुरात पार पडली. प्रफुल्ल पटेल, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना पटेल म्हणाले, येत्या महापालिका निवडणुकीत केवळ दहा-बारा जागांवर राष्ट्रवादी समाधान मानणार नाही. मागील निवडणुकीच्या वेळी जो अनुभव आला, त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये. ताकद दाखविल्याशिवाय राजकारणात काहीही मिळत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने आपली ताकद वाढविणे सुरू केले आहे. पदाधिकार्यांनी संघटन मजबूत करावे, ते वाढवावे, असे आवाहन पटेल यांनी केले. 

राष्ट्रवादीच्या स्थापनेला २२ वर्षे झाली. विदर्भात पक्षाची स्थिती कमकुवत आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचा महापालिकेत केवळ एक नगरसेवक आहे. महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी कायम राहावी, यासाठी प्रयत्न केले जातील. मात्र, योग्य सन्मान न मिळाल्यास वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो. येथील जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होती. सत्ता आल्यानंतर काँग्रेसमध्ये बदल झाला. राष्ट्रवादीला एकही सभापतीपद देण्यात आले नाही. असे प्रकार टाळण्यासाठी ताकद वाढवावी लागेल. विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीला शहरात एकही जागा दिली नव्हती. सध्या महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेसच्या मोठय़ा भावाच्या भूमिकेत असल्याचेही प्रफुल्ल पटेल यांनी अधोरेखित केले.