मुद्दा नसल्याने भाजप शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करते - गुलाबराव पाटील

October 20,2020

जळगाव : २० ऑक्टोबर - भाजपकडे आता कोणत्याही प्रकारचा मुद्दा उरलेला नाही. म्हणून ते शेतकर्यांच्या प्रश्नांवर राजकारण करत आहेत. पण त्यांना शेतकर्यांचा किती कळवळा आहे, हे आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो. भाजपने आधीच्या कर्जमाफीचा हिशेब जनतेला द्यावा, मगच मुख्यमंत्र्यांवर टीका करावी, असे खुले आव्हान शिवसेनेचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला दिले.

मंत्री गुलाबराव पाटील जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे सोमवारी दुपारी अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने आयोजित खान्देश विभागस्तरीय विचारविनिमय व पदनियुक्ती सोहळा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी भाजप नेत्यांकडून होणार्या टीकेचा समाचार घेतला. कोरोनानंतर आता राज्यात अतवृष्टीचे संकट उभे राहिलेले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडत नाहीत, अशी टीका भाजपकडून होत आहे. या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, की उद्धव ठाकरे हे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. काही कारणास्तव ते बाहेर पडले नाहीत. म्हणजे त्यांचे शेतकर्यांच्या समस्यांकडे लक्ष नाही, असे नाही. ते दररोज नियमितपणे जनतेच्या प्रश्नांचा आढावा घेतच असतात. याउलट माझे असे म्हणणे आहे, की भाजपने मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यापेक्षा मागच्या कर्जमाफीचा हिशेब द्यावा. तेव्हा कर्जमाफी करताना त्यांनी कर्जाची परतफेड नियमितपणे करणार्या शेतकर्यांना २५ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती. हे अनुदान शेतकर्यांना दिले का? शेतकर्यांना पूर्ण कर्जमाफी दिली का? हे आधी देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे. आम्ही सत्तेत आल्यानंतर जशी कर्जमाफी दिली, तशी यांनी दिली नाही. प्रोत्साहनपर अनुदानाचा एक रुपयाही शेतकर्यांना मिळाला नाही. यांना शेतकर्यांचा किती कळवळा आहे, हे आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो. शेतकर्यांच्या प्रश्नांचे भाजप नुसते राजकारण करत आहे, असा चिमटा देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी काढला.