महिला आयोगाने मागितले कमलनाथ यांना स्पष्टीकरण

October 20,2020

भोपाळ : २० ऑक्टोबर - मध्य प्रदेशच्या मंत्री इमरती देवी यांना उद्देशून ‘आयटम’ शब्द वापरल्याबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाने काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडे सोमवारी स्पष्टीकरण मागितले. आयोगाने हे प्रकरण आवश्यक त्या कारवाईसाठी निवडणूक आयोगाकडेही पाठवले आहे.

‘कमलनाथ यांनी केलेल्या या बेजबाबदार व अपमानास्पद वक्तव्याबद्दल आयोग त्यांचा तीव्र निषेध करतो. या व्हिडीओमध्ये वापरलेले शब्द बदनामीकारक असून, महिलेच्या प्रतिष्ठेबाबत अनादर व्यक्त करतात’, असे आयोगाने एका निवेदनात सांगितले.

जास्तीत जास्त महिलांनी राजकाणात यावे असे आम्हाला वाटत असतानाच, एका महिला नेत्याबाबत अशी अनादरकारक शेरेबाजी- तीही अशा महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल- अतिशय दुर्दैवी आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.

ग्वाल्हेरच्या डबरा मतदारसंघात भाजपने इमरती देवी यांना उभे केले आहे. येथील काँग्रेस उमेदवार हे साधे असून, इमरती देवी यांच्यासारखे ‘आयटम’ नाहीत, असे वक्तव्य रविवारी येथे एका निवडणूक प्रचारसभेतील भाषणात कमलनाथ यांनी केले होते.

दरम्यान, अनुसूचित जातीच्या भाजप उमेदवार असलेल्या इमरती देवी यांना काँग्रेस नेते कमलनाथ यांनी ‘आयटम’ संबोधल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे व नरेंद्र सिंह तोमर यांनी मिंटो हॉल येथे सकाळी दहा वाजेपासून सुमारे दोन तास मौन उपोषण केले. त्यांनी या घटनेचा निषेध केला असून कारवाईची मागणी केली आहे. बसपच्या प्रमुख मायावती यांनीही या प्रकाराचा निषेध करीत आपल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.