लष्करी जवानांनी केला दोन दहशतवाद्यांचा खात्मा

October 20,2020

श्रीनगर : २० ऑक्टोबर - दक्षिण काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील मेलहुरा भागात जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शिवाय, या दहशतवाद्यांकडील एके-47 रायफल व एक पिस्तुल देखील जप्त करण्यात आले आहे. काल सायंकाळापासून सुरू असलेली चकमक आज थांबल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.

चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा काल सायंकाळीच खात्मा करण्यात आला होता. तर दुसऱ्या एका दहशतवाद्यास आज ठार करण्यात आलं. हे दहशतवादी कोणत्या संघटनेशी निगडीत होते याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

गुप्तचर विभागास मेलहुरा भागात दहशतवादी दडून बसले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराच्या 55 आरआरच्या एका संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली होती. दरम्यान, जवनांची चाहूल लागताच दडून बसलेल्या दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू करण्यात आला होता. ज्याला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले गेले. आतापर्यंत या वर्षात काश्मीर घाटी परिसरात एकूण १८४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.