भारतीय वंशाच्या अमेरिकन मुलीला संशोधनाचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार

October 20,2020

नवी दिल्ली : २० ऑक्टोबर - भारतीय वंशाच्या अमेरिकी मुलीस करोनावरील संभाव्य उपचार पद्धतीसाठी २५ हजार डॉलर्सचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अनिका छेब्रोलू ही टेक्सासमधील फ्रिस्को येथे आठव्या इयत्तेत शिकत असून तिने ‘थ्री एम यंग सायंटिस्ट’ चॅलेंज स्पर्धेत भाग घेतला होता. तिने सिलिको पद्धतीने औषधी रेणू शोधण्याची पद्धत प्रस्तावित केली असून हा रेणू सार्स सीओव्ही २ म्हणजे करोना विषाणूच्या घातक प्रथिनाला जाऊन चिकटतो. थ्री एम ही अमेरिकेतील उत्पादन कंपनी आहे. छेब्रोलू  हिला गेल्या वर्षी इन्फ्लुएंझा झाला होता त्यावेळी तिने त्यावर उपाय शोधण्याचे ठरवले होते पण नंतर करोनाचा नवीन विषाणू आला त्यामुळे तिने त्यावर लक्ष केंद्रित केले. यात तिला थ्रीएमच्या वैज्ञानिकांनी औषध कसे विकसित करतात याचे प्रशिक्षण दिले. यावर्षीच्या ‘थ्रीएम’ तरुण शास्त्रज्ञ स्पर्धेतील १० अंतिम उमेदवारांत तिचा समावेश होता. यात तिला थ्री एमच्या वैज्ञानिक डॉ. महफूझा अली यांचे मार्गदर्शन लाभले. अली यांनी तिला वैज्ञानिक पद्धती समजून दिल्या. त्यानंतर तिने वैज्ञानिकांसमोर तिचा प्रकल्प सादर केला. विज्ञान हा जीवनाचा व विश्वाचा आधार आहे ते समजून घेण्यासाठी अजून बराच प्रवास बाकी आहे असे छेब्रोलू हिने म्हटले आहे. ती वैद्यकीय संशोधक  होऊ इच्छिते.