भंडाऱ्यात पालकांनी घातला शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव

October 20,2020

भंडारा : २० ऑक्टोबर - भंडारा जिल्ह्यातील सीबीएसई शाळांनी मुख्याध्यापक व शिक्षकांची रितसर नेमणूक केली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळा बेकायदेशीर असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, या मागणीसाठी पालकांनी आज जिल्हा परीषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बारसकर यांचा घेराव केला. 

शिक्षा बचाओ आंदोलन समितीद्वारे आज आक्रोश व्यक्त केल्या गेला. मागील आठ महिण्यांपासून पालकांचे आंदोलन सुरू आहे. जिल्हा परीषद शिक्षण विभागाच्या चौकशीतच अनेक सीबीएसई शाळा दोषी आढळल्या आहेत. विशेष म्हणजे बेला येथील 'रॉयल पब्लिक' व 'सेंट पिटर स्कूल' या दोन शाळांनी शिक्षक व मुख्याध्यापक यांची नियुक्तीच केली नसल्याचा तपास अहवाल २२ सप्टेंबरला दिला आहे. आता या सीबीएसई शाळांमधील विद्यार्थ्यांना आजपर्यंत शिकविले कुणी? हा गंभीर प्रश्न पालकांनी घेराव आंदोलनादरम्यान उपस्थित केला. विद्यार्थ्यांच्या टीसीवर स्वाक्षरी कुणी केली आणि जर मुख्याध्यापकच मान्यताप्राप्त नाही तर शाळेचे सर्व व्यवहार साहजिकच अनधिकृत ठरले असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. ज्या सीबीएसई शाळा शिक्षक व मुख्याध्यापक पदाची मान्यता न घेता चालविल्या जात आहेत त्यांना अवैध घोषित करावे. शाळेवर प्रशासकाची नियुक्ती करावी. संपूर्ण कागदपत्रे जप्त करावीत. रितसर पोलिस कार्यवाही करून गुन्हे दाखल करावे ही मागणी यावेळी प्रामुख्याने करण्यात आली. यावेळी शाळांच्या चौकशीसाठी पालक समितीची स्थापना करण्यात आली.

घेराव आंदोलनात नागपूर विद्यापीठ सिनेट सदस्य प्रवीण उदापूरे, शिक्षा बचाव आंदोलन जिल्हा संयोजक नितीन निनावे, प्रहार संघटनेचे अंकूश वंजारी, तुमसर पॅरेंट असोसिएशनचे अनिल कारेमोरे, जय डोंगरे, नवोदय विद्यालय संघर्ष समीतीचे भाऊ कातोरे, मधुकर देशमुख, यशवंत भोयर, पन्ना सार्वे, उमेश मोहतुरे, शादरूल शरणागत, भूषण महाकाळकर व अनेक पालक संख्येत उपस्थित होते.