कमलनाथ यांच्या वक्तव्यावर राहुल गांधींची नाराजी

October 20,2020

वायनाड : २० ऑक्टोबर - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना आज चांगलच फटकारलं. कमलनाथ यांनी भाजपच्या उमेदवार आणि माजी मंत्री इमरती देवी यांच्याबद्दल ‘आयटम’ शब्द वापरल्यामुळे देशभर वाद निर्माण झाला होता. त्यावरून राहुल गांधी यांनी त्यांना ही समज दिली. राहुल हे सध्या आपला मतदारसंघ असलेल्या वायनाडच्या दौऱ्यावर आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात विचारलेल्या एका प्रश्नावर कमलनाथ यांच्याबद्दल राहुल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

राहुल गांधी म्हणाले, कमलनाथ हे काँग्रेस पक्षाचे आहेत, मात्र अशा प्रकारची भाषा योग्य नाही. कुठल्याही नेत्याला अशी भाषा वापरणं हे चांगलं नाही. मला अशी भाषा वापरणे हे मुळीच आवडलेलं नाही. असं वक्तव्य हे दुर्दैवी आहे असंही ते म्हणाले. मध्य प्रदेशमध्ये सध्या पोट निवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे. एका प्रचारसभेत बोलताना कमलनाथ यांनी वादग्रस्त वक्तव्य दिलं होतं.