नागपूर-छिंदवाडा दरम्यानची रस्ते वाहतूक शनिवारपासून ठप्प

October 20,2020

नागपूर : २० ऑक्टोबर - ट्रकचा डाला नाल्यात पडल्यामुळे नागपूर आणि छिंदवाडा दरम्यानची रस्ते वाहतूक शनिवारपासून ठप्प झाली आहे. स्थानिक पोलिसांच्या उदासीनतेमुळे परिस्थिती आणखीनच बिघडली आहे. या मार्गावरील वाहतूक आजही सुरळीत होऊ शकली नाही रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या कित्येक किलोमीटर रांगा लागल्या आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, छिंदवाडा जिल्ह्यात रामाकोणाजवळ मोठा नाला आहे. त्यावर पूल तयार करण्यात येत आहे. हा पूल काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बनवला होता. त्याला भेगा पडल्यामुळे हा पूल तोडून पुन्हा पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. या कामामुळे नाल्याच्या बाजूने रास्ता वळविण्यात आला आहे. शनिवारी नाल्याच्या बाजूने असलेल्या अरुंद रस्त्यावरून जाताना अवजड मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचा डाला नाल्यात पडला त्यामुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली. 

छिंदवाड्यावरून नागपूरला येणाऱ्या आणि नागपूरवरून छिंदवाड्याला जाणाऱ्या वाहनांच्या अनेक किलोमीटर रांगा लागल्या. शनिवारी ठप्प झालेली वाहतूक आजही ठप्पच होती. नागपूर - जबलपूर हायवेवरचा मोठा भाग बंद असल्यामुळे जबलपुरवरून नागपूरकडे येणाऱ्या आणि छिंदवाडा मार्गाने जबलपूरला जाणाऱ्या वाहनांची त्यात भर पडल्याने वाहतूक आणखीनच विस्कळीत झाली. जॅममध्ये अडकलेल्या काही नागरिकांनी दोन पोलीस कर्मचारी शेकडो वाहनांच्या जॅमला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्यांना यश आले नाही. वाहतूक सुरळीत करण्यासाठी अधिक पोलिसांची गरज होती. परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग असूनही पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील  एकही वरिष्ठ अधिकारी परिस्थिती हाताळण्यासाठी घटनास्थळी पोहोचला नाही.