दारू न मिळाल्याने कोरोना रुग्णाने केला डॉक्टरच्या खुनाचा प्रयत्न

October 20,2020

नागपूर : २० ऑक्टोबर - आधीच दारूचे  जबर व्यसन त्यातच कोरोनाची लागण. चिंताजनक अवस्थेत त्याला मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. उपचारादरम्यात तब्बल १० दिवस दारुविना राहावे लागले. मात्र, रविवारी मध्यरात्री त्या कोविड रुग्णाचा संयम सुटला आणि त्याने चक्क नर्सजवळची कात्री हिसकावून डॉक्टरचा खून करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे कोविड वार्डात एकच गोंधळ उडाला होता पण एमएसएफ जवानांच्या सतर्कतेमुळे अनुचित प्रकार टळला. 

दारूची तलब लागलेल्या एका व्यक्तीला कोरोना झाला. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मेडिकलच्या वार्ड क्रमांक एसबी-४ मध्ये भरती करण्यात आले होते. तिथे त्याच्यावर उपचार सुरु होते. आधीच कोविड वार्डात कुणाला जाण्या-येण्याची परवानगी नाही आहे. त्यामुळे या कोरोना रुग्णाची चांगलीच गोची झाली. काही दिवसांपासून त्याने दारू मिळविण्यासाठी चांगलेच प्रयत्न केले, पण अपयशी ठरला. शेवटी दारू मिळत नसल्याने त्याचा संयमाचा बांध फुटला. आणि त्याने वार्डातील एका नर्सच्या ट्रेमधील कात्री घेऊन एका डॉक्टरला मारण्यासाठी धावला, पण डॉक्टर सतर्क असल्याने त्याने मदतीला महाराष्ट्र सुरक्षा बाळाच्या जवानांना आवाज दिला. या प्रकारामुळे कोरोना वार्डात एकच गोंधळ उडाला. 

अखेर महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी तातडीने पीपीई किट घातली आणि वार्डात प्रवेश करून त्या धिंगाणा घालणाऱ्या कोविड रुग्णाला पकडले त्यानंतर त्याला स्वतंत्र खोलीत बंद केले. जवळपास अर्धा तास हे नाट्य चालले. महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी दाखवलेल्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.