चंद्रपुरात घरासमोरूनच कार चोरीला गेली, पाच दिवस होऊनही पोलिसांना कार शोधण्यात अपयश

October 20,2020

चंद्रपूर : २० ऑक्टोबर - चंद्रपूर येथील रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील शेंडे ले आऊटमध्ये घरासमोर पार्किंग केलेली कार चोरट्यांनी पाठविल्याची घटना पाच दिवसांपूर्वी घडली विशेष म्हणजे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पाच दिवसांनंतरही पोलिसांना चोरट्यांचा शोध घेण्यात यश आले नाही. 

शेंडे ले आऊटमध्ये के. डी. शेंडे यांच्या घरी संजयसिंग मौर्य हे भाड्याने राहतात. त्यांनी घरासमोर एमएच ३४/ बीबी ०१२९ या क्रमांकाची कार पार्क केली होती. १६ ऑक्टोबरच्या रात्री चोरट्यांनी ही कार पळवून नेली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. १७ ऑक्टोबरला कार चोरीची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली. मात्र, घटनेच्या पाच दिवसांनंतरही कार चोरटे शिधण्यात पोलिसांना यश आले नाही. घरासमोर पार्क केलेली कारहि सुरक्षित नसेल तर, चंद्रपूरकरांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न उभा झाला आहे. चंद्रपूर शहरात मागील काही दिवसांत चोरीच्या छोट्या मोठ्या घटनेत खूप वाढ झाली आहे. मात्र, त्यातील काहीच घटनांचा उलगडा होत असून बहुतेक प्रकरणात चोर मोकाट फिरत असल्याने पोलिसांच्या  भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.