गडचिरोलीचा चोर नागपुरात पकडला

October 20,2020

नागपूर : २० ऑक्टोबर - गाडीच्या डिक्कीतून दोन मोबाईल चोरी प्रकरणात एका आरोपीला अटक केल्यानंतर त्याने गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा येथील एका कपड्याच्या दुकानात केलेल्या चोरीचा उलगडा झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून १ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिषेक किशोर वैष्णव (१९, रा. म्हाडा कॉलोनी, नारी कपिलनगर, नागपूर) व त्याचा मित्र असिफ अन्सारी गाडीच्या डिक्कीमध्ये नादुरुस्त मोबाईल ठेऊन गाडीला लॉक लावून कराटे मैदान, बिरसा मुंडा पुतळ्यासमोर रोड पलीकडे एका चहा टपरीवर चहा पिण्यासाठी गेले. खाद्य वेळाने ते परत आले असता त्यांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवलेले रेडमी नोट -९ प्रो कंपनीचा व विवो वाय ९३ कंपनीचा मोबाईल दिसला नाही. संशयावरून फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथक गस्तीवर असताना त्यांना आरोपी राहुल शेषराव उईके (२५, रा. वनदेवीनगर, यशोधरा नगर, नागपूर) हा संगीत हायस्कुल जवळच्या नागोबा मंदिराजवळ एका एवेन्जर  गाडीवर  बसलेला दिसला. पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्यांनी त्याची अंगझडती घेतली असता दोन मोबाईल सापडले. या मोबाइलबाबत विचारणा केली असता त्यांनी एका गाडीच्या डिक्कीमधून मोबाईल चोरी केल्याचे सांगितले.

पोलीस ठाण्यात आणून त्याची अधिक चौकशी केली असता त्याने पाच ते सहा महिन्यांपूर्वी गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा येथील एका कपड्याच्या दुकानात चोरी करून लॅपटॉप आणि प्रिंटरची चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीच्या घरातून डेस्कटॉप, प्रिंटर, दोन मोबाईल,  एवेन्जर दुचाकी असा एकूण १ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त केला.