गोंदियाच्या विकासाकडे आता विशेष लक्ष केंद्रित करणार - प्रफुल्ल पटेल

October 20,2020

गोंदिया : २० ऑक्टोबर - मागील १५ वर्षांपासून गोंदिया जिल्ह्यासह शहराचा विकास रखडला आहे. त्यांनी विकासाचा उहापोह केला. त्यांनीच विकासाचे तीनतेरा वाजवले असे माध्यमांच्या प्रतिनिधींकडून ऐकण्यात येत आहे, आता आपण गोंदिया शहराच्या विकासाकडे विशेष लक्ष केंद्रित करू , असे आश्वासन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना दिले. 

गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर खा. पटेल आले असताना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. याप्रसंगी शहरातील समस्या व विकासाला घेऊन उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आपण आता शहरातील विकासकामांवर लक्ष केंद्रित करणार आहोत, शहराच्या भूमिगत गटार कामासाठी निधी उपलब्ध आहे मात्र, ते काम रखडले आहे. या संदर्भात मजीप्राच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. लवकरच त्या कमला प्रगती मिळणार तसेच घनकचरा व्यवस्थापन  प्रकल्पाचे प्रश्न सोडविण्यात येणार, शहरात भूमिगत विद्युत वाहिन्यांचे कामाला पटलावर आणण्याचे काम सुरु आहे. शहराच्या  बायपास रस्त्यांचे चौपदरीकरण देखील करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जुन्या उड्डाणपुलासाठी तयार करण्यात आलेला स्ट्रक्चर अपघात प्रवण आहे. असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नव्याने स्ट्रक्चर तयार करून त्याला त्वरित प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यासंदर्भि अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. हे काम देखील लवकरच प्रगतीपथावर येईल. याशिवाय गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, या दृष्टिकोनातून विशेष नियोजनदेखील करण्यात येणार आहे. विकास म्हणजे, प्रत्येक व्यक्तीचा व्हावा, हे उद्देश ठेऊन दरडोई उत्त्पन्न कसे वाढेल? यासाठी प्लॅन तयार करण्यात येणार आहे. मात्र, याबाबत आपण काही तांत्रिक अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत, अशी ग्वाही खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली.