राज्यपाल कोश्यारी यांना न्यायालयीन अवमान प्रकरणी उत्तराखंड उच्च न्यायालयाची नोटीस

October 20,2020

डेहराडून : २० ऑक्टोबर - महाराष्ट्राचे राज्यपाल आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी  यांच्या विरोधात कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी उत्तराखंड उच्च न्यायालयाने   नोटीस बजावली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी या नोटिशीला ४ आठवड्यांमध्ये उत्तर द्यावे, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायाधीश शरदकुमार शर्मा यांच्या पीठाने एका स्वयंसेवी संस्थेच्या (एनजीओ) याचिकेवर सुनावनणी करताना ही नोटीस जारी केली आहे

रुरल लिटिगेशन अँड एन्टायटलमेंट केंद्राने (रुलक) या उत्तराखंड उच्च न्यायालयात  जनहीत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करत असताना न्यायालयाने गेल्या वर्षी माजी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान, तसेच इतर सुविधांसाठीची थकलेली देय रक्कम ६ महिन्यांच्या आत जमा करण्याचे आदेश दिले होते. कोश्यारी यांनी कोर्टाच्या आदेशानुसार, आपले देणे जमा केले नाही. याच कारणामुळे मंगळवारी  कोर्टाने त्यांच्या विरोधात नोटीस जारी केली आहे.

रुलकनेच कोश्यारी यांनी ही रक्कम जमा न करून कोर्टाचा अवमान केल्याबाबतची याचिका दाखल केली होती. यावर कोर्टाच्या आदेशाचे पालन का केले गेले नाही, अशी विचारणा कोर्टाने राज्य सरकारकडे केली आहे. या प्रकरणी माजी मुख्यमंत्री कोश्यारी यांच्या विरोधात खटला का दाखल करू नये?, अशी विचारणा कोर्टाने केली आहे.