संघाचा विजयदशमी उत्सव यंदा मैदानाऐवजी सभागृहात

October 20,2020

नागपूर : २० ऑक्टोबर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगराचा विजयादशमी उत्सव यंदा २५ आक्टोबर २०२० रोजी साजरा होणार असून यावर्षी कोणतेही शारीरिक प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम होणार नाहीत. या कार्यक्रमाला मोजक्याच संख्येत स्वयंसेवक उपस्थित राहणार असून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत त्यांना मार्गदर्शन करतील. सरसंघचालकांचे भाषण फेसबुकच्या माध्यमातून देशभर दाखवले जाणार आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपुरतील विजयादशमी उत्सव हा अतिशय महत्वाचा कार्यक्रम मानला जातो. या कार्यक्रमात संघाचे सरसंघचालक जे मार्गदर्शनपर भाषण करतात ते संघाची पुढील वर्षभरातील नेमकी वाटचाल कशी असेल याचे दिशादर्शन करणारे असते. त्यामुळे माध्यमांसह देशभरातील संघप्रेमी आणि इतरही राजकीय कार्यकर्ते तसेच अभ्यासक यांचे या भाषणाकडे लक्ष लागलेले असते. नागपुरातील या कार्यक्रमाला सुमारे ५००० गणवेशधारी स्वयंसेवक आणि २० ते २५ हजार नागरिक उपस्थित असतात त्याशिवाय माध्यमांच्या द्वारे हा कार्यक्रम देशभर दाखवला जातो. 

हा कार्यक्रम दरवर्षी रेशीमबाग मैदानावर होत असतो. यंदा कोविडच्या परिस्थितीमुळे मोजकेच स्वयंसेवक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे विजयादशमीच्या दिवशी सकाळी ७.३० वाजता हा कार्यक्रम रेशीमबाग परिसरातील महर्षी व्यास सभागृहात आयोजित केला असल्याची माहिती नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांनी  दिली आहे.