सांख्यिकी प्रणालीच्या डिजीटलायझेशनमुळे योजनांचे अचुक नियोजन शक्य - कृष्णा फिरके

October 20,2020

नागपूर : २० ऑक्टोबर - सांख्यिकी प्रणाली गुणात्मक व अचुक गोळा करण्यासाठी वेगवेगळया सांख्यिकीय पध्दतीचा वापर करण्यात येत आहे. डिजीटलायझेशनमुळे वेळेत आवश्यक माहिती तात्काळ उपलब्ध होण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन अर्थ व सांख्यिकी सहसंचालक कृष्णा फिरके यांनी आज केले.

अर्थ व सांख्यिकी विभागातर्फे जागतिक सांख्यिकी दिन साजरा करण्यात आला. यावेळी श्री. फिरके बोलत होते. यावेळी नियोजन उपआयुक्त धनंजय सुटे, सांख्यिकी उपआयुक्त सरिता मुरेकर, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, नियोजन अधिकारी उपस्थित होते.

जिल्हयाच्या सांख्यिकी माहितीचा आधार हा नियोजनासाठी करण्यात येत असल्यामुळे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन या पुस्तकाची निर्मिती करण्यात येत असल्याचे सांगतांना सहसंचालक कृष्णा फिरके म्हणाले की, अचुक व परिणामकारक माहिती वेळेत संकलित करण्यासाठी डिजीटलायझेशन या प्रभावी वापर आवश्यक आहे. जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद आदी विभागाच्या योजनांचे मूल्यमापनाच्या कार्यासाठी सांख्यिकी पध्दतीचा योग्य वापर करण्याबाबत विविध उपाय यावेळी सूचविण्यात आलेत.

नियोजनामध्ये अचुक डाटा संकलन महत्वाचे आहे. माहितीचे संस्करण करुन वेगवेगळे निष्कर्ष काढण्याचे कार्य सांख्यिकी पध्दतीचा वापर करुन अहवाल तयार करण्यात आल्यावरच त्याचा अंतरभाव नियोजनात करण्यात येत असल्याचे श्री फिरके यांनी सांगितले.

जागतिक सांख्यिकी दिन सयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येतो. आजचा सांख्यिकी दिन हा तिसरा जागतिक सांख्यिकी दिन साजरा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाने राज्य सांख्यिकी माहिती अधिक बळकट करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या वापरावर अधिक भर देण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले. आभार उपसंचालक  सरिता मुरेकर यांनी मानले.