अतिक्रमण हटविण्याचा निषेध करण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न

October 24,2020

वर्धा, 24 ऑक्टोबर : नगरपरिषद प्रशासनाकडून वर्धा शहरात अतिक्रमण हटविण्याची मोहिम चालविण्यात येत आहे. दयालनगर परिसरात भाजी विक्रेत्या महिलांनी कारवाईचा विरोध करीत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.

वर्धा शहरातील विविध भागातील अतिक्रमण हटविण्यात येत आहे. फळे, बाजीपाला विक्रेत्यांसाठी शहरातील सर्कस मैदान, ईदगाह मैदान, ठाकरे मार्केट, गोल बाजरच्या आतील परिसरात विक्रेत्यांना ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. तरीसुद्धा रस्त्याच्या लगत दोन्ही बाजूीला विक्रेते आपली दुकाने थाटून विक्री करतात. अतिक्रमणाच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता नगरपरिषदेकडून अतिक्रमण हटविण्याची मोहिम राबविण्यात आली. नगरपरिषदेच्या पथकाने गोलबाजार परिसर, जुनी नगर परिषद इमारत व दयालनगर परिसरात कारवाई केली. दुपारी दीड वाजताच्या सुमारास दयालनगर परिसरात भाजीपाल विक्रेत्या महिलेने कारवाईचा विरोध केला. एवढ्यावरच न थांबता आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. कर्मचार्‍यांनी महिलेला थांबविले. घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.