घरी एकट्या असलेल्या युवतीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला काही तासातच केली अटक

October 24,2020

चंद्रपूर, 24 ऑक्टोबर : घरी पिण्याचे पाणी मागण्याच्या बहाण्याने प्रवेश करून एकटी असलेल्या युवतीवर अत्याचार केल्याची घटना चिमूर तालुक्यातील खडसंगीजवळच्या पांढरपौनी येथे 21 ऑक्टोबर रोजी घडली. दरम्यान पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपीला काही तासातच अटक करण्यात आली असून भूपेंद्र उर्फ तिखट गजानन चिंचाळकर असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी हा पाणी मागण्याच्या बहाण्याने 21 वर्षीय पीडितेच्या घरी गेला. यावेळी पीडिता एकटीच असल्याची संधी साधून आरोपीने युवतीवर बळजबरीने अत्याचार केला. दरम्यान पीडितेने आरडाओरड केल्याने बाजूच्या खोलीत असलेल्या तिच्या वहिनीने धाव घेतली. यावेळी आरोपी पीडितेच्या खोलीत आढळून आला. दोघांनी आरडाओरड केल्याने आरोपीने पीडितेच्या वहिनीला धक्का मारून घराचा दरवाजा बाहेरून लावून पळ काढला. रस्त्याने जाणार्‍या एका व्यक्तीने दरवाजा उघडला. दरम्यान, घडलेल्या प्रकाराची तक्रार पीडितेने चिमूर पोलिस ठाण्यात दिली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून काही तासातच अटक करण्यात आली.