आज चीनला धडा शिकवला, मात्र भविष्यात सावध राहून शक्ती वाढवा - सरसंघचालक डॉ. भागवत

October 25,2020

नागपूर : २५ ऑक्टोबर -  चीननं आपल्या सीमेवर जो व्यवहार केला आहे, त्यातून  त्यांचा स्वभाव विस्तारवादी आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.  त्यांनी फक्त भारतासोबतच नव्हे तर इतर अनेक देशांसोबत वाद केला आहे. यावेळी  भारताने जो काही वार त्यांच्यावर केला त्यामुळे चीनला माघार घेणे भाग पडले.  भारतीय सेनेनं चीनला चांगला धडा शिकवला. जगातल्या बाकी देशांनाही यामुळे बळ मिळाले. मात्र आता आपल्याला सावध राहावे लागेल. कारण ते चिनी काहीही करु शकतात. आपल्याला आता सर्व आघाड्यांवर  चीनपेक्षा बलशाली व्हावे लागेल.  शेजारी राष्ट्रांसोबत संबंध आणखी दृढ करावे लागतील. आपण सर्वांशी मैत्री ठेवतो  कुणाशी भांडण्याचा स्वभाव आपला नाही. मात्र आपल्या स्वभावात असलेले सौजन्य ही  आपली दुर्बलता समजणं चूक आहे हे जगाला जाणवून द्यावे लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.  

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आभासी पद्धतीने रविवारी सकाळी आयोजित करण्यात आला यावेळी देशभरातील संघस्वयंसेवकांना डॉ. भागवत संबोधित करीत होते.  याप्रसंगी विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया व सहसंघचालक श्रीधर गाडगे उपस्थित होते. रेशीमबाग परिसरातील महर्षी व्यास सभागृहात झालेल्या या समारोहात फक्त ५० गणवेशधारी स्वयंसेवक उपस्थित होते. 

 याप्रसंगी बोलताना डॉ. मोहन भागवत यांनी, १९२५ नंतर एवढा कमी उपस्थितीत विजयादशमी उत्सव साजरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोरोना महामारीच्या पाश्र्वभूमीवर निर्माण झालेल्या स्थितीने अनेक क्षेत्रात बदल होत आहेत. सावधानी आणि नियमांचे पालन आवश्यक आहे. या महामारीने अनेकांना संयमाचे धडे दिले. याच काळात ३७० कलम निष्प्रभ होणे, श्रीराम मंदिरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणे आदी घटना घडल्या पण भारतीय समाजाने त्या संयमाने स्वीकारल्या व त्याचे स्वागत केले.

यावेळी बोलतांना डॉ. भागवत यांनी चीनच्या विस्तारवादाचे संभाव्य धोके जाणवून देत त्यासाठी आंतरिक शक्ती वाढवण्यासाठी काय केले जावे याचे सविस्तर विश्लेषण आपल्या सुमारे ६५ मिनिटांच्या भाषणात केले. ते म्हणाले की  विविधतेत एकता हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे, पण विद्यमान स्थितीत विविधतेमध्ये जात, धर्म, संप्रदाय आदींवरुन समाजात वेगळेपणाची भावना निर्माण करण्याचे प्रयत्न काही लोक करीत आहेत. हे प्रयत्न हाणून पाडून शाश्वत एकतेचे दर्शन समाजाने घडवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

 नागरिकत्व कायद्याचा विषय आला, त्यावेळी मुस्लिम समाजाची दिशाभूल करुन समाजात भिती निर्माण करण्याचे काम झाले. आता कोरोना बाबत देखील असाच दुष्प्रचार सुरू असल्याचे डॉ. भागवत यांनी सांगितले. कोरोना काळात शासन, प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या पण त्यातून भीती अधिक निर्माण झाली. त्यामुळे कोरोना हा रोग खुप नुकसान करेल एवढी त्याची क्षमता नाही पण भीतीमुळे नुकसान होण्याचा संभव आहे. यासाठी भीती न बाळगता नियमांचे पालन आणि सजगता आवश्यक आहे. या काळात डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार, पोलिस आदींनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता काम केले, ते सर्व अभिनंदनास पात्र आहेत. या काळात समाजातील सेवाभाव देखील प्रगट झाला. समाजाने प्रशासनाला सहकार्य केले. या कामात ज्यांचा मृत्यु झाला ते हुतात्मा असल्याचे डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले.

 कोरोनामुळे समाजात एकूणच निराळी परिस्थिती निर्माण झाली. या रोगामुळे आपल्यापासून दूर गेलेले लोक परतत आहेत. पण आता त्यांचे रोजगार गेले, आता पुन्हा तो रोजगार नसल्याने त्यांना नवे कौशल्य अर्जित करावे लागेल. शाळा कॉलेज बंद असल्याने शिक्षकांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे समाजात निराशा आणि तणाव आहे.तो दूर करण्यासाठी समुपदेशन गरजेचे आहे. त्यासाठी समाजाने आणि संघस्वयंसेवकांनी पुढाकार घ्यावा अशी सूचनाही त्यांनी केली. 

सत्ता प्रत्येकाला हवी असते. सत्तेसाठी संघर्ष करतानाही विवेक वापरायला हवा. निवडणुकांमध्ये वैचारिक लढा हवा, युद्ध नको. सामाजिक अंतर निर्माण करणं हे राजकारण नाही. निवडणूक ही एक स्पर्धा आहे. ही स्पर्धा खेळीमेळीनं व्हावी, असेही डॉ. भागवत यांनी यावेळी सुचवले.  धर्मनिरपेक्षतेचं नाव घेऊन समाज तोडण्याची भाषा करणारे आज देशात पुढे येत आहेत. याकडे लक्ष वेधत त्यांना वेळीच प्रतिबंध घालावा लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले.  कुठल्याही स्थितीत  सामाजिक भान समजून व्यक्त होणं गरजेचं असल्याचं देखील ते म्हणाले. संविधानाचं आणि अहिंसेचं पालन आपल्याला करायचं आहे. भडकाऊ बोलणाऱ्यांपासून सावध राहण्याची गरज आहे. परस्पर विश्वासाचं वातावरण बनवून प्रत्येक समस्येचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

 कोरोना काळात चांगलं काय आणि वाईट काय हे लोकांना लक्षात आले.  अनेक गोष्टी सुधारल्या आहेत. हवा शुद्ध झालीय, नदी नाल्यांचं पाणी चांगलं झालंय. अनेक पक्षी नवीन पाहायला मिळाले आहेत. अनावश्यक गोष्टी सोडल्यानं हा नवा आनंद आपल्याला मिळत आहे. सांस्कृतिक रितीरिवाज आणि स्वच्छतेचं महत्व आपल्याला कळलं आहे. आपल्या सांस्कृतिक मूल्यांचं आचरण करणं आपल्या लक्षात आलं आहे. पर्यावरणासोबत मित्र म्हणून राहणे आपल्या लक्षात आलं आहे. कोरोनाच्या या माराने काही सार्थक गोष्टींकडे आपल्याला वळवलं आहे . कोरोनामुळं जुन्या परंपरांना देखील महत्व आलं आहे,त्याचे आपण स्वागत करायला हवे, कुटुंब व्यवस्थेचे महत्व पुन्हा एकदा उजागर झाले आहे त्याचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. भागवत यांनी यावेळी केले.

यावेळी बोलतांना नवे कृषीविषयक कायदे, नवे शैक्षणिक आणि औद्योगिक धोरण यांचाही परामर्श डॉ. भागवत यांनी आपल्या भाषणात घेतला. आपल्याकडील शेतकरी खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होऊ शकतो, जर त्याचा माल तो स्वतः विकू शकेल. त्याला बियाणे-खत यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही, पर्यायाने त्याला आत्महत्या करावी लागणार नाही. हीच स्वदेशी कृषी नीती आहे. आपण सध्या ती लागू करु शकत नसलो, तरी भविष्यात ती लागू करण्यात यावी यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे असा आग्रह त्यांनी धरला.

कोरोनाच्या काळात आपण स्वदेशी शब्दाचा वारंवार प्रयोग केला. या स्वदेशी शब्दातील देशी म्हणजे नीती झाली. मात्र, त्यामधील 'स्व' हे खरंतर हिंदुत्वच आहे. तसेच, १८५७च्या उठावानंतर देशभरात जे विचारमंथन झाले, त्याचा गाभा आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेत आहे, ज्याचाच अर्थ हिंदुत्व आहे, आपण सर्व भारतमातेचे पुत्र आहोत. आपण सर्व प्रथम भारतीय आहोत. याला आम्ही हिंदू असणे म्हणतो, तुम्ही कदाचित दुसरं काही म्हणत असाल. मात्र, त्याने आपण सर्व भारतीय आहोत हे सत्य बदलत नाही हे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

संघ हा केवळ हिंदू धर्मासाठी काम करतो असा अपप्रचार काही लोक करतात. मात्र, आम्ही जेव्हा हिंदुराष्ट्र असा शब्दप्रयोग करतो, तेव्हा देशातील सर्व नागरिकांना तो हिंदू शब्द लागू होतो. देशात अनेक जाती-धर्मांचे लोक राहतात हे मान्य आहे. मात्र, आम्ही जेव्हा त्यांना हिंदू म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ भारतीय नागरिक असा असतो. हिंदू शब्द हा केवळ पूजेपुरता मर्यादित करत, संघावर टीका करणाऱ्यांनी याचा अर्थ संकुचित केला आहे. मात्र, भारत देशातील सर्व १३० कोटी नागरिकांना हिंदू हा शब्द लागू होतो, अशी ग्वाही डॉ. भागवत यांनी यावेळी दिली.