मराठी भाषेला दिलेला हिंदीचा तडका सुखावणारा - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

November 13,2020

नागपूर : १३ नोव्हेंबर - महाराष्ट्रात मराठी साहित्याचा एक अनोखा संगम झालेला आहे. त्यातून महाराष्ट्रात अनेक चांगल्या साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत, मी महाराष्ट्रातल्या खासदारांना जेव्हा भेटतो तेव्हा त्यांची मराठी भाषा मला भावते, त्यातही मराठी भाषेला ते हिंदीचा जो तडका देतात तो अधिकच सुखावून जातो, असे मत महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल श्री भगतसिंहजी कोश्यारी यांनी आज व्यक्त केले. 

ज्येष्ठ मराठी पत्रकार आणि साहित्यिक अविनाश पाठक लिखित सत्तेच्या सावलीत हा राजकीय कथासंग्रह आणि दृष्टिक्षेप हा वैचारिक लेखांचा संग्रह अशा मुंबईच्या भरारी प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या डॉ पुस्तकांचे आज राज्यपाल श्री भगतसिंहजी कोश्यारी यांनी आभासी पद्धतीने लोकार्पण केले त्यावेळी ते बोलत होते. दिल्लीच्या चाणक्य वार्ता प्रकाशनाने आभासी पद्धतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक लक्ष्मीनारायणजी भाला हे होते, ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक डॉ. उदय निरगुडकर हे  प्रमुख वक्ते म्हणून तर माजी राज्यसभा सदस्य अजयजी संचेती हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. 

यावेळी बोलतांना राज्यपाल म्हणाले की आम्हाला कुठूनही ज्ञान मिळाले तर आम्ही त्या व्यक्तीला धन्यवादच देतो, पुस्तकांच्या माध्यमातून आम्हाला ज्ञान मिळत असते आज प्रकाशित झालेल्या दोन्ही पुस्तकांबद्दल त्यांनी लेखक अविनाश पाठक  आणि भरारी प्रकाशनाला धन्यवाद दिले. सत्तेच्या सावलीत या कथासंग्रहातून राजकारणातील अनेक गोष्टी वाचकांना कळतील तर दृष्टिक्षेप या वैचारिक लेखांच्या संग्रहातून जनसामान्यांचे निश्चित प्रबोधन होईल, असा विश्वास राज्यपाल महोदयांनी व्यक्त केला. अविनाश पाठक  यांचे आज प्रकाशित झालेले १२वे आणि १३वे पुस्तक आहे. याकडे लक्ष वेधत त्यांनी मराठी वाचकांसाठी अधिकाधिक लेखन करावे यासाठी राज्यपालांनी शुभेच्छा दिल्या. 

यावेळी चाणक्य वार्ता या हिंदी नियतकालिकाचे संपादक डॉ. अमित जैन यांचेही राज्यपालांनी कौतुक केले. चाणक्य वार्ताच्या माध्यमातून विविध राज्यांमध्ये ते कार्यक्रम आयोजित करतात याकडे लक्ष वेधत त्यांच्या विविध उपक्रमांसाठी राज्यपालांनी शुभेच्छा दिल्या. 

अविनाश पाठक यांनी पत्रकारिता करताना काय मिळेल याचा विचार न करता काय देता येईल याचाच विचार करीत प्रसंगी परखड पत्रकारिता केली, त्यामुळेच विविध विषयांवर त्यांची १३ पुस्तके प्रकाशित झाली याचा प्रमुख वक्ते डॉ. उदय निरगुडकर यांनी आवर्जून उल्लेख केला. सत्तेच्या  सावलीत या कथासंग्रहात पाठक  यांनी राजकीय वास्तवाचे यथार्थ चित्रण केले आहे याकडे लक्ष वेधत अविनाश पाठक यांनी राजकीय विश्वावर स्वतंत्र कादंबरी लिहावी, ती निश्चित गाजेल असे मत त्यांनी व्यक्त केले. लॉक डाउनच्या काळातही आभासी पद्धतीने अविनाश पाठक यांच्या आभासी पद्धतीने होणाऱ्या पुस्तक प्रकाशनाला जो प्रतिसाद मिळाला  तो बघता अविनाश पाठक यांनी पुढेही पुस्तके लिहावी, त्याचा वसंतराव देशपांडे सभागृहात दणदणीत प्रकाशन समारंभ करू आणि त्यावेळीही वक्ता म्हणून मी येईन असे त्यांनी जाहीर केले. 

यावेळी बोलतांना माजी राज्यसभा सदस्य अजय संचेती यांनी अविनाश पाठक यांच्या पत्रकारिता आणि साहित्यातील योगदानाची पुरेशी कदर झाली नाही याबद्दल दुःख व्यक्त केले. निरगुडकरांच्या भाषणातील धागा पकडत पाठक लवकरच कादंबरी लेखन करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

पत्रकारिता करताना पत्रकाराची दृष्टी ही स्वच्छ आणि शुद्ध असावी लागते अविनाश पाठक यांच्या लेखनातून त्यांची स्वच्छ दृष्टी वाक्यावाक्यातून दिसून येते. हेच त्यांच्या लेखनाचे खरे यश असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक लक्ष्मीनारायणजी भाला यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. विशेषतः दृष्टिक्षेप या पुस्तकात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत जे लेख लिहिले त्यातून त्यांनी टीकाकारांना उत्तर दिले आणि सामान्यांचे गैरसमजही दूर केले. याकडे त्यांनी लक्ष वेधले. एक पत्रकार, स्तंभलेखक आणि साहित्यिक या कसोट्यांवर अविनाश पाठक खरे उतरले आहेत या शब्दात त्यांनी दोन्ही पुस्तकांचे कौतुक केले. 

सुरुवातीला चाणक्य वार्ताचे प्रधान संपादक डॉ. अमित जैन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून आपली भूमिका विशद केली. त्यानंतर लेखक श्री अविनाश पाठक यांनी आपल्या भाषणात पुस्तक लेखनामागील भूमिका स्पष्ट केली. राज्यपाल कोश्यारी यांनी दोन्ही पुस्तकांच्या लिंकवर क्लिक करून पुस्तकांचे औपचारिक लोकार्पण केले. भरारी प्रकाशनाच्या लता गुठे यांनी आभार प्रदर्शन केले. 

अविनाश पाठक यांची सत्तेच्या सावलीत आणि दृष्टिक्षेप ही दोन्ही पुस्तके इ-बुक्स म्हणून प्रकाशित झाली असून किंडल, अँमेझॉन आणि पुस्तक भरारी या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.