आमदार रणधीर सावरकरांनी केली बोंड अळीग्रस्त शेतीची पाहणी

November 17,2020

अकोला : १७ नोव्हेंबर - अकोला जिल्ह्यात बोंड अळीच्या थैमानाने कापूस पीक शेतकरी अडचणीत आला आहे. हातचे पीक जाण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत कापूस तज्ज्ञ शास्त्रज्ञांबरोबर आमदार रणधीर सावरकरांनी वेळोवेळी शिवारात शेतात जाऊन पाहणी केली व प्रत्यक्ष कापूस पीक क्षेत्रावरच तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. 

जिल्ह्यातील अनेक गावात कापूस उत्पादक शेतकऱ्यांपुढे गुलाबी बोंड अळीचे संकट उभे आहे. कृषी विभागाने कापूस पीक नुकसानीचा प्राथमिक अहवाल नुकताच तयार केला आहे. या अहवालात सांगितले की जवळपास ८० टक्के कापूस पेरणीचे क्षेत्र  बोंड अळीने ग्रासले असून हा अहवाल नुकताच सादर करण्यात आला आहे. सदर अहवालात ३० टक्के कपाशी पिकाचे नुकसान  झाल्याची शक्यता कृषी विभागाने शासनाकडे कळविली आहे. यासर्व पार्श्वभूमीवर आमदार रणधीर सावरकर  यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कापसी पीक शेतावर पाचारण करून डॉ. पंजाबराव देशमुख  कृषी विद्यापीठातील कपाशी तज्ज्ञ शास्त्रज्ञ डॉ. उंदीरवाडे यांचेसह शेतकऱ्यांचे उपस्थितीत केळीवेळी शिवारातील  कापूस पिकाची पाहणी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात कापूस पीक धोक्यात आल्याने पूर्ण पीक नष्ट होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली. प्रत्यक्ष भेटीदरम्यान पंचक्रोशीतील अनेक शेतकरी यांच्यासह असंख्य कार्यकत्रे उपस्थित होते.