अंबाझरी जैवविविधता उद्यानात २५० पक्ष्यांच्या प्रजातीची नोंद

November 17,2020

नागपूर : १७ नोव्हेंबर - अंबाझरी जैवविविधता उद्यानात २५० पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. अलीकडेच पार पडलेल्या  पक्षीसप्ताहाच्या निमित्ताने पक्ष्यांची नोंदणी करण्यात आली. त्याद्वारे ही  संख्या वनविभागाने जाहीर केली आहे. 

राज्यात ५ ते १२ नोव्हेंबर दरम्यान पक्षीसप्ताहानिमित्त नागपूर वनविभागाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यात पक्षी प्रजातींच्या नोंदणीचा उपक्रमही होता. पक्षी निरीक्षकांनी आपल्या नोंदणी ऑनलाईन स्वरूपात सादर करावयाच्या होत्या . या नोंदणीच्या आधारे नागपूर आणि अंबाझरी येथील ही  पक्षिसंख्या समोर आली आहे. नागपूर वनविभागाचे उपवनसंरक्षक  प्रभुनाथ शुक्ल यांच्यासह अनेक पक्षी निरीक्षक वेबिनार द्वारे यात सामील झाले होते. यादरम्यान पक्षीसंवर्धनाशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शनही करण्यात आले.  ऑनलाईन छायाचित्र स्पर्धा, बर्ड रेस इत्यादी उपक्रमही झाले. छायाचित्र स्पर्धेत विविध गटात  विजयी झालेल्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. बर्ड रेमधील विजेत्यांनाही बक्षिसे देण्यात आली.  अंबाझरी जैवविविधता उद्यानातील फुलांच्या वैविध्यावर संशोधन करणाऱ्या चंद्रमोहन यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.  फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या विभागीय केंद्राचे चंद्रमोहन यांनी सांगितले की अंबाझरी जैवविविधता  उद्यानात ४१५ वृक्षांच्या प्रजाती आढळल्या असून त्यात फक्त ८चा वृक्ष स्थानिक आहेत. देशभरातील  १३४९ पक्षांच्या प्रजाती आढळतात त्यापैकी सुमारे ३५० प्रजाती नागपुरात आढळल्या आहेत. 

उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला म्हणाले, उद्यानातील अंबाझरी बायोडायव्हर्सिटी डॉट कॉम या संकेतस्थळावर संरक्षण, गस्त घालण्यासाठी  स्वयंसेवक म्हणून नोंदणी करू शकणार आहेत. स्वयंसेवक म्हणून नोंदणी केल्यानंतर पक्षी निरीक्षक त्यांची  छायाचित्रे वेबसाईटमध्ये उपलोड  करण्यासाठी पाठवू शकणार आहेत. हा उपक्रम पक्षी सप्ताहापुरताच नाही तर वर्षभर राबविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.