शेतकर्‍याचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी नव्या मॉडेलचा प्रस्ताव

November 21,2020

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनद्वारे शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी एक मॉडेल प्रस्ताव तयार केला आहे. विदर्भातील यवतमाळ, गडचिरोली किंवा मराठवाड्यातील उस्मानाबाद यापैकी एका जिल्ह्यात प्राथ्यक्षिक स्वरुपात अंमलबजावणी व्हावी, याबाबत मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नुकतकेच सादरीकरण केले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या प्रस्तावाला रुपरेषा देण्याचे निर्देश कृषीमंत्री दादा भुसे यांना दिले आहे.

या मॉडेल प्रस्तावासंबंधी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनीसांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सहा वर्षांपासून शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात अत्यंत संथ गतीने काम चालले आहे. अजूनपर्यंत परिणाम दिसून आले नाही. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय केेंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना विश्‍वासात घेऊन करणे आवश्यक होता. त्या विषयी सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा, केंद्र सरकारने अजूनपर्यंत ठोस पावले उचललेली नाहीत. राज्य सरकारच्या शेती स्वावलंबन मिशनद्वारे शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, यासाठी एक आदर्श असा मॉडेल शेतकरी आत्महत्याग्रस्त एका जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबवावा, असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यात प्रमुख चार घटकांवर भर देण्यात आला आहे. त्यांचे अंतिम परिणाम उत्पन्न दुप्पट होण्यात येईल असा विश्‍वास तिवारी यांनी व्यक्त केला आहे.