सध्याच्या शिवसेनेच्या भगव्या रंगात भेसळ ः देवेंद्र फडणवीस

November 21,2020

बाळासाहेब ठाकरेंचा भगवा हा हिंदुत्वाचा खरा रंग होता. वर्तमानातील शिवसेनेच्या भगव्यामध्ये काँग्रेसची भेसळ झाली. अशी टीका माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ते भाजप उमेदवार महापौर संदीप जोशींच्या प्रचारार्थ नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. फडणवीस म्हणाले की, आजचा भगवा हा भगवा राहिलेला नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह लिखाण करणारे शिवसेनेला गोड वाटतात. जम्मू काश्मिरात चीनच्या मदतीने त्या ठिकाणी पुन्हा 370 कलम लागू करण्याची भाषा करीत असून काँग्रेस त्यात शामील आहे. अशा काँग्रेससोबत सत्तेच्या लालसेपोटी मांडीला मांडी लावून बसेल्या शिवसेनेने भगव्याबद्दल बोलू ुनये, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

महाविकास  आघाडी सरकारने पदवीधर आणि शिक्षकांचा भ्रमनिरास केल्याची टीका देखील यावेळी त्यांनी केली. फडणवीस सरकारने विजेची कोट्यवधी रुपयांची थकबाकी ठेल्यामुळे 41 हजार कोटींचे कर्ज झाल्याचा आरोप ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केला होता. राऊतांनी मांडलेल्या आकडेवारीनंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने बीजबिल माफीच्या फसव्या घोषणा करून जनतेची फसवणूक केली आहे. हे तोंडघशी पडलेले सरकार असून त्यांनी वीज बिलांच्या थकबाकीची चौकशी अवश्य करावी असे आव्हान फडणवीस यांनी केले.