दहशतवाद्यांना आणण्यासाठी पाकिस्तानानेच भुयार खणल्याचे पुरावे आले समोर

November 24,2020

नवी दिल्ली : २४ नोव्हेंबर - नागरोटा येथे चकमकीत खातमा करण्यात आलेल्या जैश-ए-मोहम्मदचे चार अतिरेकी पाकिस्तानी बाजूकडून खोदण्यात आलेल्या भुयारातूनच  आल्याचा सज्जड पुरावा सीमा सुरक्षा दलाने समोर आणल्याने पाकिस्तान पुन्हा एकदा उघडा पडला आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर २०० मीटर लांब आणि ८ मीटर खोल असलेले हे सुरुंग अत्यंत व्यावसायिकपणे खोदण्यात आल्याचेही निष्पन्न झाले आहे.

या सुरुंगाचा व्यास १२ ते १४ इंचाचा आहे. आंतरराष्ट्रीय सीमेपासून भारतीय हद्दीत १६० मीटर अंतरापर्यंत, तर पाकिस्तानी बाजूकडून ४० मीटर लांबीपर्यंत हे सुरुंग खोदण्यात आले. हे सुरुंग अलिकडेच खोदण्यात आले आणि त्याचा पहिला वापर जैशच्या चार अतिरेक्यांनी भारतात घुसखोरी करण्यासाठी केला, अशी माहिती सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. हे सुरुंग खोदण्यासाठी अभियांत्रिकी तंत्राचा वापर करण्यात आला. अतिरेक्यांच्या घुसखोरीत पाकिस्तानचा हात असल्याचे यावरून सिद्ध झाले आहे, असे एका दहशतवाद विरोधी विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले आहे.

 जैशच्या अतिरेक्यांकडे तैवानधील ईट्रेक्स-२०एक्स गार्मिन ग्लोबल पोजिशनिंग सिस्टिम (जीपीएस) उपकरण होते. सीमा सुरक्षा दल आणि सुरक्षा यंत्रणांनी या उपकरणाच्या माध्यमातून अतिरेक्यांनी केलेल्या प्रवासाचा उलगडा केला. सुरुंगातून भारतात घुसखोरी केल्यानंतर केलेल्या प्रवासाची माहिती या उपकरणात आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय सीमेपासून १२ किमी अंतरापर्यंत ट्रकमध्ये बसेपर्यंतचा प्रवासाच्या माहितीचा देखील समावेश आहे. सुरक्षा दलाने ठार करण्यापूर्वी जीपीएस उपकरणातील माहिती नष्ट करण्याचा प्रयत्न अतिरेक्यांनी केला होता. मात्र, त्यांना यश मिळाले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.