काँग्रेस मुख्यालयाला मिळाली १०६ कोटी रुपयाची बेहिशेबी रोख रक्कम, आयकर खात्याचा दावा

November 24,2020

नवी दिल्ली : २४ नोव्हेंबर - नवी दिल्ली येथील कॉंगे्रसच्या मुख्यालयाला २०१६ ते २०१९ या काळात १०६ कोटी रुपयाची बेहिशेबी रोख रक्कम मिळाली असल्याची धक्कादायक माहिती आयकर खात्याच्या ४०८ पानांच्या अहवालातून बाहेर आली असून, आयकर खात्याने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

ही रक्कम तीन टप्प्यांमधून मुख्यालयाला पाठविण्यात आली आहे आणि कॉंगे्रस मुख्यालयातील कोषाध्यक्षांनी ती स्वीकारली असल्याचे यात नमूद आहे.

आयकर खात्यातील नोंदींवरून असेही दिसून आले आहे की, कॉंगे्रस मुख्यालयाला २७ फेबुवारी २०१९ रोजी ५.४ कोटी, २८ फेबु्रवारी रोजी ३.७५ कोटी आणि २० एप्रिल २०१९ रोजी ६.४० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यानंतर आणखी एक व्यवहार उघडकीस आला असून, या अंतर्गत २४ एप्रिल रोजी ५.४५ कोटी रुपये देखील पाठविण्यात आले होते. विशेष म्हणजे, २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर हा संपूर्ण व्यवहार झालेला आहे.

अशी प्राप्त झाली रोख

पहिला टप्पा : २६ कोटी ५० लाख (ऑगस्ट ते सप्टेंबर २०१६)

दुसरा टप्पा : ५ कोटी २२ लाख (एप्रिल ते सप्टेंबर २०१७)

तिसरा टप्पा : ७४ कोटी ६२ लाख (१३ फेबु्रवारी ते ४ ऑक्टोबर २०१९)

म्हणून नोटबंदीला विरोध होता : भाजपा

८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नोटबंदी जाहीर केली होती. या निर्णयावर कॉंगे्रस अजूनही टीका करीत आहे. आता या पक्षाने, इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा मुख्यालयात कसा आला, याचे उत्तर द्यायला हवे. गांधी घराण्याला फक्त पैसा हवा आहे, हे आता सिद्ध झाले असून, कॉंगे्रसच्या अध्यक्ष या नात्याने, सोनिया गांधी यांनीच यावर देशाला स्पष्टीकरण द्यावे, असे भाजपाचे अमित मालवीय यांनी म्हटले.