ऑक्सफर्डची कोरोना लस मिळणार ३०० रुपयात

November 24,2020

नवी दिल्ली : २४ नोव्हेंबर - भारत सरकारला ऑक्सफर्डची कोरोनाप्रतिबंधक लस बाजारपेठेपेक्षा अर्ध्या किमतीत म्हणजेच २२५ ते ३०० रुपयांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे. लसीची बाजारपेठेतील किंमत ५०० ते ६०० रुपये आहे.

जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत देशात ऑक्सफर्डची लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भारताची प्रचंड लोकसंख्या लक्षात घेता केंद्र सरकार या लसीची खरेदी मोठ्या प्रमाणात करणार असल्याने सरकारला ही लस अर्ध्या किमतीत मिळण्याची शक्यता आहे.

ही लस सर्वप्रथम ‘कोरोना योद्धे’ म्हणजेच डॉक्टर्स, परिचारिका, पोलिस, स्वच्छता कर्मचारी तसेच कोरोनासंबंधी काम करणार्या अन्य कर्मचार्यांना देण्यात येणार आहे. भविष्यात सार्वजनिक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत या लसीचे मोफत वाटपही होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकार पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाला कोरोनाच्या लसीच्या वापरासंबंधी मंजुरी देण्याची शक्यता आहे. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया या डिसेंबरच्या अखेरपर्यंत केंद्र सरकारकडे आपात्कालीन मंजुरीसाठी अर्ज करणार असल्याचे सांगण्यात येते. कोरोनाच्या लसीच्या खरेदीसंबंधी केंद्र सरकार लसनिर्मिती कंपन्यांशी अंतिम चर्चा करीत असल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनलाही मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. भारत बायोटेकनेही पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातील लसीच्या चाचणीचे परीक्षण पूर्ण केले आहे. यामुळे भारत बायोटेकलाही लसीच्या आपात्कालीन चाचणीसाठी मंजुरी मिळू शकते. कंपनीतर्फे आता तिसर्या टप्प्यातील चाचणीची माहिती प्रकाशित करण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारत बायोटेकची लस फेब्रुवारीपर्यंत बाजारात येईल, असे एका अधिकार्याने सांगितले.

सीरम इन्स्टिट्युटने ब्रिटनमध्ये त्यांच्या लसीच्या प्रभावासंबंधी माहिती जमा केल्यानंतर भारतात त्याच्या आपात्कालीन वापरासंबंधी विनंती केल्यास केंद्र सरकार त्याला मंजुरी देण्याची शक्यता आहे. भारत बायोटेकच्या बाबतीतही केंद्र सरकार असा विचार करू शकते. असे घडले तर मार्च अखेरपर्यंत भारतात एकापेक्षा जास्त कोरोनाच्या लसींची उपलब्धता होण्याची शक्यता आहे.

‘स्पुटनिक व्ही’ मॉडर्ना, फायझरपेक्षाही स्वस्त?

मॉस्को – अमेरिकेच्या मॉडर्ना आणि फायझर या कंपन्यांची लस पुढील एक-दोन महिन्यात येण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ ही लसदेखील लस स्पर्धेत असणार आहे. मॉडर्ना आणि फायजर यांच्या लसीपेक्षा ‘स्पुटनिक व्ही’ची किंमत कमी राहणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

जगभरात आता कोरोनासंसर्गाची दुसरी लाट आली असताना दुसरीकडे लस विकसित करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. काही लसींची तिसर्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. या चाचणीतील प्राथमिक निष्कर्ष सकारात्मक आले आहेत.

दरम्यान, रशियन वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाच्या स्पुटनिक व्ही या लसीची किंमत पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. रशियाने पहिल्यांदाच कोरोनाला अटकाव करणारी लस म्हणून स्पुटनिकला मान्यता दिली होती. भारतात या रशियन लसीची मानवी चाचणी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीच्या वतीने होणार आहे.