कोरोना काळात राज्य सरकारने केंद्राकडे बोट दाखवण्याचेच काम केले - देवेंद्र फडणवीस

November 24,2020

मुंबई : २४ नोव्हेंबर - कोरोना काळात राज्य सरकारने कोणालाही पॅकेज दिले नाही, कोणालाही फुटक्या कवडीची मदत केली नाही. काही झाले तरी फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याचे काम राज्य सरकारने केले असल्याची खोचक टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य सरकारने कोरोना काळात कोणाला मदत केली नाही. शेतकर्यांना, दुकानदारांना किंवा रिक्षावाल्यांही सरकारने मदत केली नाही. तर दुसरीकडे मात्र छोट्या राज्यांनी त्याठिकाणी मदत केली पण महाराष्ट्र सरकारने कोणतीच मदत केली नसल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

राज्य सरकारला याचा पदवीधरसंघाच्या निवडणुकीत मोठा फटका बसण्याचा अंदाज देखील फडणवीस यांनी वर्तवला. सध्या सहा मतदारसंघाच्या निवडणुका होत आहेत. त्यामध्ये तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एक स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. त्यामुळे यंदा भारतीय जनता पक्षावर जनता विश्वास दाखवेल असे देखील ते म्हणाले. त्याचप्रमाणे सरकारमधील तीन पक्ष एकत्र आले तरी जनता त्यांच्यावर विश्वास न दाखवता त्यांना पराभूत करेल अशी दाट शक्यता देखील देवेंद्र फडणवीस यांनी याठिकाणी व्यक्त केली. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गतवर्षी पहाटे शपथविधी घेत महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणलेल्या त्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्या शपथविधीवर भाष्य केले असून आता पहाटे शपविधी घेण्याची गरज पडणार नाही, असे म्हटले आहे. जे झाले ते झाले. पण आता तुम्हाला ज्यावेळी शपथविधी पाहण्यास मिळेल तेव्हा पहाटेची वेळ नसणार आहे. योग्य वेळी शपथविधी पाहण्यास मिळणार आहे. त्या अडीच दिवसांच्या सोहळ्यावर पुस्तक लिहण्याचे काम सुरू आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. असल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नसतात, असेही यावेळी ते म्हणाले.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यावरही भाष्य केले. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या विधानाचा विपर्यास केला गेले, असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आमच्यासाठी हा विषय संपला आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.