बिहारमध्ये लव्ह जिहादचा कायदा करा, मगच आम्ही विचार करू - संजय राऊत

November 24,2020

मुंबई : २४ नोव्हेंबर - गेल्या काही दिवसांपासून देशात लव जिहाद प्रकरण चर्चेत आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहाद विरोधात कायदा केला जाणार असल्याची चर्चा असून, महाराष्ट्रातही हा मुद्दा उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या घटना रोखण्यासाठी कायदा करण्यात यावा, अशी मागणी भाजपा नेत्यांकडून केली जात आहे. भाजपाच्या मागणीला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर देत आव्हान दिले आहे.

विकास हाच निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा असतो. पण, लव्ह जिहादचा मुद्दा समोर आला आहे. त्याचे स्वागत करतो. महाराष्ट्रात कायदा कधी होणार असं काही नेते म्हणत आहेत. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात कायदा केला जाणार आहे. राज्यातील काही भाजपाचे जे प्रमुख नेते विचारत आहेत की, महाराष्ट्रात कायदा कधी होणार? माझी सकाळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. या विषयावर आम्ही इतकं सांगू की, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात कायदा होऊ द्या. पण, बिहारमध्ये नितीश कुमार जेव्हा लव्ह जिहादचा कायदा आणतील. त्या कायद्याचा आम्ही अभ्यास करू. त्यानंतर महाराष्ट्रात कायदा आणण्याविषयी विचार करू. बिहारमध्ये भाजपाचे सरकार आहे. नितीश कुमार भाजपाचेच मुख्यमंत्री आहेत. कारण सर्वात जास्त जागा भाजपाच्या आहेत. नितीश कुमार तिसर्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपाचाच आहे, असे संजय राऊत म्हणाले.

अर्थव्यवस्था सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. बेरोजगारी, महागाई या मुद्यांपेक्षा मोठा लव्ह जिहाद असेल, तर आधी बिहारमध्ये कायदा होऊ द्या. अभ्यास करून महाराष्ट्रात कायदा करण्याचा विचार करू. पंतप्रधानांचे म्हणणे भाजपा नेत्यांना समजत नाही. दुसर्या महायुद्धापेक्षाही भयंकर संकट असल्याचे पंतप्रधान सांगत आहेत. पण, महाराष्ट्रात भाजपाचेच नेते पंतप्रधानांचेच ऐकत नाहीयेत. उलट आंदोलन करत आहेत. रस्त्यावर उतरत आहे, जसे काही हे कोरोनाचेच बाप आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.