शरद पवारांवर टीका केली तर इतका त्रागा का? - गोपीचंद पडळकर

November 24,2020

सांगली : २४ नोव्हेंबर - ज्या पक्षाचे चार खासदार निवडून येतात, त्यांना तुम्ही लोकनेते म्हणता, मग ३0३ खासदार निवडून आणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचे? तुम्ही मोदींवर टीका करता. आम्ही शरद पवारांवर टीका केली, तर मग इतका त्रागा का करता? असा सवाल आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांना विचारला आहे. पुणे पदवीधर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ सांगलीत सोमवारी आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केल्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पाटील यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. या वादात आता भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही उडी घेतली आहे.

पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने आमदार पडळकरांनी महाविकास आघाडीवर टीका केली. ते म्हणाले, ही निवडणूक केवळ महाविकास आघाडीच्या विरोधातील नसून, ती भ्रष्टाचाराच्या विरोधातील आहे. विश्वासघाताच्या विरोधातील, प्रखर जातीयवादाच्या विरोधातील आहे. मतदारांनी याचा नीट विचार करावा. दरम्यान, भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने खासदार संजय पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी एकाच व्यासपीठावर हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही नेत्यांमधील राजकीय वाद धुमसत आहे. गेल्याच आठवड्यात आटपाडी तालुक्यात दोन्ही नेत्यांचे सर्मथक आमने-सामने भिडले होते. यावरून दोन्ही नेत्यांमधील संघर्ष तीव्र होण्याची चर्चा सुरू होती. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे खासदार संजय पाटील आणि पालकमंत्री जयंत पाटील यांच्यात जवळीक वाढली आहे. अनेक कार्यक्रमात दोघे एकत्र दिसले, तर भाजपच्या काही कार्यक्रमांना खासदार पाटील अनुपस्थित होते. यावरून खासदार पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, कोणी काहीही अपप्रचार केली तरी, मी कुठेही जाणार नाही. मी आहे तिथेच थांबणार असल्याचे खासदार पाटील यांनी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना स्पष्ट केले.