भारत - पाकिस्तान-बांगलादेशचे विलीनीकरण झाल्यास स्वागत - नवाब मलिक

November 24,2020

मुंबई : २४ नोव्हेंबर - शिवसेना नेते नितीन नांदगावकराकंडून कराची स्वीट्सचे नाव बदलण्याच्या मागणीवर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना कराची एक दिवस भारताचा भाग असेल असा टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली असून भाजपाने भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशचे विलगीकरण केल्यास आम्ही स्वागत करू असे म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी कराची भारताचा भाग असेल ती वेळ येईल असे म्हटले आहे. आम्हीदेखील भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशचे विलगीकरण करा असे म्हणत आहोत. जर बर्लिनची भिंत पाडली जाऊ शकते तर भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशचे विलगीकरण का होऊ शकत नाही? जर भाजपा हे तिन्ही देश एकत्र करुन एक मोठा देश निर्माण करत असेल तर आम्ही नक्की त्याचे स्वागत करू, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

मुंबईतील वांद्रे भागात असलेल्या कराची स्वीट्सचे नाव बदला अशी मागणी नितीन नांदगावकर यांनी केली होती. कराची हे पाकिस्तानातील शहर असल्याने या शहराच्या नावाने भारतात दुकान असल्याने आपल्या जवानांचा अपमान होतो अस नांदगावकर यांनी आपल्या मागणीवर स्पष्टीकरण देताना म्हटले होते.