पदवीधर मतदारसंघात मतदारांची नावे गहाळ होतो आहे आरोप

November 24,2020

नागपूर : २४ नोव्हेंबर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठातून दरवर्षी लाखो विद्यार्थी उत्तीर्ण होतात. परंतु, पदवीधर मतदारसंघात केवळ 2 लाख 6 हजार 454 मतदारांची नावे आहेत. त्यामुळे लाखो पदवीधर गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे हजारो पदवीधरांनी एक नव्हे तर दोनदा अर्ज भरूनही त्यांची नावे पुरवणी यादीत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 पदवीधर मतदारसंघाची निवडणूक दर सहा वर्षांनी होते. पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेला सदस्य हा विधानपरिषदेवर जात असतो. या निवडणुकीत केवळ पदवीधर असलेला व्यक्तीच मतदान करतो. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया अशा सहा जिल्ह्याचा समावेश होतो. नागपूर विभागात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठांचा समावेश होता. या दोन्ही विद्यापीठातून दरवर्षी लाखो विद्यार्थी उत्तीर्ण होतात. पदवीधर हा मतदार सुशिक्षित आहे. 2019 साली झालेल्या नोंदणीदरम्यान हजारो पदवीधरांनी अर्ज केले. मात्र, त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत त्यांची नावे नव्हती. त्यामुळे 5 नोव्हेंबर या अखेरच्या दिवसांपर्यंत जिल्हा निवडणूक कार्यालयाला हजारो अर्ज प्राप्त झाले. त्यानंतर 13 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या पुरवणीत यादीतून अर्ज भरणार्यांची नावेच नाहीत. काही पदवीधरांनी जिल्हा निवडणूक कार्यालयात धाव घेतली. परंतु, या कार्यालयाकडून थातुरमातूर उत्तर देण्यात आले.

 पुणे पदवीधर मतदारर्सघात चार लाखाहून अधिक पदवीधरांची नोंदणी झाली. मग नागपुरात 2 लाख मतदार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. अधिक मतदार वाढले तर जिल्हा निवडणूक प्रशासनाची डोकेदुखी वाढते. मतदान केंद्रात वाढ होते. मग निवडणूक यंत्रणा तोडकी पडते. त्यामुळे कमी मतदारामध्ये निवडणूक घेण्याचा प्रयत्न जिल्हा निवडणुक विभागाकडून केला जात असल्याचा आता आरोप होत आहे. यावरून जिल्हा निवडणूक विभागाचा भोंगळपणाही चव्हाटयावर आलेला आहे. उत्तर नागपूर विधानसभा मतसंघात राहणार्या एका व्यक्तीने दोनदा अर्ज भरले. त्या अर्जाची पावतीही आहे. परंतु, दोन्ही वेळेत मतदार यादीत नाव नसल्याने या मतदारांनी संताप व्यक्त केला. मतदानाचा अधिकार हिरावण्याचा प्रयत्न जिल्हा निवडणूक विभागाकडून होत असल्याचा गंभीर आरोपही या व्यक्तीने केला. याशिवाय मतदारयादीत अनेकांच्या नावात चुका झालेल्या आहेत. त्यामुळे मतदार याद्यांबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. 

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आलेल्या मतदारांच्या अर्जांची छाननी करून त्यांची नावे पुरवणी मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात येत असतात.मात्र, अनेक अर्जाचा विचारच करण्यात आलेला नाही. अर्ज का नामंजूर केले, याचे स्पष्टीकरण या विभागामार्फत दिले जात नाही. यासंदर्भात उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे म्हणाल्या, आम्ही अर्ज पाठविले होते, पण यादीत नाव आले नाही, याबद्दल आम्ही काहीच करू शकत नाही, असे मोघम उत्तर त्यांनी दिले.