कुख्यात राजा गोल्डनकडून दोन पिस्तूल जप्त

November 24,2020

नागपूर : २४ नोव्हेंबर - सक्करदरा हद्दीतून राजा गोल्डन याच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्टल आणि माऊजर जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपीवर आर्म्स अँक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

प्राप्त माहितीनुसार, सक्करदरा पोलिसांचे पथक परिसरात गुन्हय़ांची शहानिशा करीत असताना २१ नोव्हेंबरला रात्री १0 वाजताच्या सुमारास पोलिस हवालदार राजेंद्र यादव यांना माहिती मिळाली की, एनआयटी मार्केट, आशीर्वादनगर येथे शेख नदीम ऊर्फ राजा गोल्डन हा युवक स्वत:जवळ अग्निशस्त्र बाळगून आहे. माहिती मिळताच पोलिस पथक तेथे पोहचले. पोलिसांना पाहून राजा गोल्डनने पळून जायचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला पकडले. पंचासमक्ष त्याची चौकशी केली असता, त्याने स्वत:चे नाव शेख नदीम ऊर्फ राजा गोल्डन वल्द शेख नाजीम (२३) रा. मोठा ताजबाग असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळून एक सिल्व्हर रंगाची देशी बनावटीचे माऊजर (कि. २0 हजार) मिळून आले. त्याची अजून चौकशी केली असता, त्याने अजून एक पिस्टल लपवून ठेवले असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला त्याच्या घरी नेले. तेथून त्याने देशी बनावटीचे काळय़ा रंगाचे अग्निशस्त्र (कि. २0 हजार) काढून दिले. याप्रकरणी आर्म्स अँक्ट अंतर्गत सक्करदरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.