हॉकी प्रशिक्षक गुरुमूर्ती पिल्ले यांचे निधन

November 24,2020

नागपूर : २४ नोव्हेंबर -  हॉकी आणि गुरुमूर्ती यांचे नाते तसे अतूटच. गुरुमूर्ती पिल्ले यांनी आपले संपूर्ण आयुष्यच हॉकीसाठी खर्ची केले. ८३ व्या वर्षी त्यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. ही पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. त्यांच्या निधनाने व्हीएचएने लोकप्रिय अष्टपैलू व्यक्तिमत्त्व तर गमावलेच, शिवाय युवा खेळाडूंचा सच्चा गुरू व मार्गदर्शकही हिरावून नेला आहे. आझाद चौक, सदर येथे राहणारे पिल्ले यांच्या पार्थिवावर सायंकाळी मानकापूर घाटावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी व्हीएचएच्या पदाधिकार्यांसह क्रीडा जगतातील अनेक मान्यवर उपस्थित होते. माजी राष्ट्रीय हॉकीपटू, रेल्वेचे माजी कर्णधार, माजी आंतरराष्ट्रीय हॉकी पंच, क्रीडा संघटक, तांत्रिक अधिकारी आणि विदर्भ हॉकी संघटनेचे (व्हीएचए) माजी सचिव व आजीवन सदस्य अशा विविध भूमिका यशस्वीरित्या पार पडणारे विदर्भाचे गुरुमूर्ती यांची हॉकीवर र्शद्धा होती. अनेक खेडाळू तयारही केले. गुरुमूर्ती यांनी १९६४ ते ७२ या काळात विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विदर्भाचे प्रतिनिधित्व केले. भारतीय रेल्वे आणि पाकिस्तान रेल्वे यांच्यात झालेल्या सामन्यातही पंचगिरी करण्याचा त्यांना बहुमान मिळाला होता. पिल्ले यांनी खेळाडू व कर्णधार म्हणून रेल्वे संघाकडूनही शानदार कामगिरी बजावली आहे.