नीलगायींच्या शिंगाने केला घात, युवकाचा अपघाती मृत्यू

November 24,2020

नागपूर : २४ नोव्हेंबर - दुचाकी वाहनाने जात असलेल्या युवकाचा रस्त्यात निलगाय आडवी आल्याने अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना कोराडी हद्दीत घडली. राहुल पुरूषोत्तम डांगरकर (३0, रा. परदेसी, धापेवाडा) असे मृताचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, १९ नोव्हेंबरला रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास राहुल हा त्याच्या दुचाकी क्र. एम. एच. ४0 / डब्ल्यू. पी. ६४७५ ने जात होते. दरम्यान, कोराडी हद्दीत लोणारा रोड विटाभट्टीजवळ निलगाय रस्त्यात आडवी आल्याने राहुल निलगायीला दुचाकीसह धडकला. यात निलगायीचे शिंग राहुलच्या गळ्याला लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरिता अँलेक्सिस हॉस्पिटल येथे नेण्यात आले. तेथून त्याला मेडिकल येथे रेफर करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान सोमवारी (२३ नोव्हेंबर) सकाळी १0.५ वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मिळालेल्या सूचनेवरून कोराडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.