यवतमाळमध्ये शाळा सुरु न करण्यासाठी शिक्षकांनी दिले निवेदन

November 24,2020

यवतमाळ : २४ नोव्हेंबर - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने डिसेंबरपर्यंत शाळा सुरू करू नये, अशी मागणी जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रा. राजेश चव्हाण यांच्या नेतृत्वात निवेदन देताना देविदास राठोड, संतोष पवार, महेश राठोड, मन्साराम सावळकर हे शिक्षक उपस्थित होते.

जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोरोना पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत शाळा सुरू करण्यासंदर्भात घेतलेला निर्णय आणि यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांची केलेली कोरोना चाचणीमध्ये आतापर्यंत 89 शिक्षक कोरोनाबाधित निघाले असून अनेक शिक्षकांच्या चाचणीचे अहवाल येणे बाकी आहे.

 तसेच कायम विनाअनुदानित तत्त्वावर शाळेतील शिक्षकांच्या चाचण्यादेखील बाकी आहेत. ही स्थिती पाहता त्यात जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली तर बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. दिवाळीत झालेल्या एकत्रीकरणातून कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. तसेच शाळेत विद्यार्थी आले तर मोठे संकट उद्भवू शकते, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

 त्यादृष्टीने खबरदारी म्हणून इतर जिल्ह्यांमध्ये जसे नागपूर, अकोला, मुंबई, ठाणे, अमरावती, कोल्हापूर, पुणे येथे घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आपल्याही जिल्ह्यात किमान डिसेंबरपर्यंत सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवल्यास आपल्याला कोरोनाचा प्रसार थांबवता येईल. तरी डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.